मुंबईतील स्टेशन्स, फूटओव्हर ब्रिज आणि गर्दीच्या वेळी बाहेर पडण्याच्या जागा या सगळ्या ठिकाणाहून येत्या १५ दिवसात फेरीवाले हटवा. त्यांना रेल्वेने हटवले नाही तर मग मनसे स्टाईल राडा करून  हटवावे लागेल आणि जो संघर्ष होईल त्याची जबाबदारी रेल्वेची असेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या भाषणात दिला.

मनसेतर्फे २९ सप्टेंबरला झालेल्या एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीचा निषेध करत गुरुवारी संताप मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या भाषणात आक्रमक भूमिका मांडत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले.

भाषणाची सुरूवात करतानाच मी तुम्हाला ‘मेट्रोजवळ या’  असे सांगितले आणि तुम्ही ‘मित्रो’ न ऐकता योग्य ठिकाणी आलात हे पाहून बरे वाटल्याचे सांगत, त्यांनी पंतप्रधानांना टोला लगावला. एखादी दुर्घटना घडली की राज्य सरकारतर्फे फक्त समिती नेमली जाते, या समित्यांकडून काय हाती येते ठाऊक नाही असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने विश्वास ठेवला आणि भाजपला मते दिली. मात्र या सरकारने जनतेचा विश्वासघात केला. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न कधी सुटणार? सुरेश प्रभू  चांगले काम करत होते मात्र त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना पद सोडावे लागले असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणांवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. देशातील महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नातून मार्ग काढायचे सोडून नोटाबंदीसारखा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. स्वच्छ भारत अभियान आणि योगाचे महत्त्व सांगत बसले, मात्र या सगळ्यामुळे सामान्य माणसाचे नुकसानच झाले. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर कसा भरायचा हे चार्टड अकाऊंटंटलाही कळत नाही अशी अवस्था आहे. हेच का अच्छे दिन? १५ लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात येणार होते त्याचे काय झाले? असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले.

‘प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख’ बाबत अमित शहा म्हटले होते की तो तर ‘चुनावी जुमला’ होता. नितीन गडकरी जाहीर मुलाखतीत म्हणतात ‘अच्छे दिन’चे हाडूक आमच्या गळ्यात अडकले आहे. यावरूनच सरकार किती दुटप्पी आहे हे स्पष्ट होते असाही आरोप त्यांनी केला.

जी अवस्था केंद्रात ती अवस्था राज्यातही.. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली तर नुकसान होईल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले. म्हणजे राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देखील राज्य सरकारने मारलेली थाप आहे असाही आरोप राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला.

बुलेट ट्रेनला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. गुजरात आणि मुंबईतील मूठभर गुजराती व्यापाऱ्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातो आहे त्याची गरजच काय? कोणता मुंबईकर मुंबईहून बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. भाषणाच्या शेवटी एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.