राज्यातील टोलआकारणी होणाऱया महामार्गांवर बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलनमध्ये कोणतीही तोडफोड किंवा नासधूस न करण्याची सूचना करण्यात आली आहे. आंदोलनामुळे शहरांतील दळणवळण बंद होऊ नये, याचीही काळजी घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.
मनसेतर्फे बुधवारी राज्यातील टोलनाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे स्वरुप सांगण्यासाठी राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, राज्यातील टोलच्या प्रश्नावर चर्चा करण्यास मुख्यमंत्री तयार असून, मनसेने रास्ता रोको आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्नवीद्वारे काहीवेळापूर्वीच माझ्याकडे करण्यात आली. मात्र, सरकारबरोबर अगोदरही चर्चा झाली आहे. त्यातून काहीच घडले नाही. नव्याने चर्चा करून पुन्हा सरकार तोंडाला पाने पुसणार असेल, तर काय उपयोग. असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. टोलचा प्रश्न खरंच सोडवायचा असेल, तर सरकारने कालावधीनिहाय नियोजन द्यावे. नुसत्याच चर्चेला अर्थ नाही, असे ते म्हणाले.
राज्यात बारावीच्या प्रयोग परीक्षा सुरू असल्यामुळे शहरातील दळणवळण कोलमडू नये, यासाठी काळजी घेण्यात आली आहे. सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पडतील. त्यामध्ये कोणताही व्यत्यय आणला जाणार नाही, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, रास्ता रोको आंदोलन प्रातिनिधिक आहे. त्यातून सरकारने काही केले नाही तर येत्या २१ तारखेला मुंबईत गिरगाव चौपाटीपासून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतरही लोकशाही मार्गाने सरकार काही ऐकणार नसेल, तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, असाही इशारा त्यांनी दिला.
राज ठाकरे वाशी टोलनाक्यावर
रास्ता रोको आंदोलनात राज ठाकरे स्वतः वाशी टोलनाक्यावर सहभागी होणार आहेत. मात्र, वाशी टोलनाक्यावर किती वाजता येणार, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
मुख्यमंत्र्यांना टोलपेक्षा जागावाटप महत्त्वाचे
राज्यात टोलचा प्रश्न चर्चेत असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये जागावाटपाच्या बोलण्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना टोलपेक्षा जागावाटप जास्त महत्त्वाचे आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.