संदीप आचार्य 
मुंबई: विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयाच्या आवारा जवळ कार्यरकर्त्यांची गर्दी जमू लागली आणि रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या चेहेऱ्यावरील तणाव वाढू लागला. पोलीसही बंदोबस्तासाठी हजर होते. थोड्याच वेळात मनसेचे नेते संदीप देशपांडे तेथे पोहोचले. रुग्णालय प्रशासनाशी बोलण केले त्यानंतर थोड्या वेळाने करोना रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. चौदा दिवस उपचार घेणाऱ्या साठीच्या घरातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बिल भरण्यावरून उद्भवलेला पेचप्रसंग मनसे रुग्णालयात पोहोचल्या नंतर निकाली निघाला.

मनसेच्या एका महिला पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना करोनाची लागण झाल्यानंतर नानावटी रुग्णालयात ३१ मे रोजी दाखल करण्यात आले. सदर महिलेवर अतिदक्षता विभागात गेले तेरा दिवस उपचार सुरु होते. त्यानंतर आज पाहाटे या महिलेचे निधन झाले. या चौदा दिवसांच्या उपचारासाठी रुग्णालयाने ६,७८,४१६ रुपये बिल आकारणी केली होती. यातील दीड लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांनी भरले होते व पाच लाख २८ हजार रुपये भरण्याचे बाकी असताना आज पाहाटे रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर शिल्लक बिल भरण्याच्या मुद्दा निर्माण झाल्यामुळे दुपारपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ चालवल्याचे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सांगितले.

नियमानुसार रुग्णाच्या नातेवाईकांकडे बिलाची पुरेशी रक्कम नसेल तर हमी (अंडर टेकिंग) घेऊन मृतदेह ताब्यात दिला जातो. मात्र दुपारी रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह मिळत नसल्याचे आपल्याला दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर काही पदाधिकारी घेऊन आपण दुपारी साडेतीनच्या सुमारास नानावटी रुग्णालयात पोहोचलो. तेथे सुरक्षा अधिकाऱ्यांशी थोडा ‘प्रेमाचा’ संवाद झाल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनप्रीत सोहेल यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाले. यानंतर कोणतेही अंडर टेकिंग न घेता साडेचारच्या सुमारास रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ

करोना उपचारासाठी १४ दिवसांचे सुमारे सात लाखाच्या घरातील बिल हे खूपच जास्त असून पीपीइ किट साठी ६९,८७६ रुपये तर पॅथॉलॉजी चे १,२७,२३० रुपये आकारण्यात आले. याशिवाय करोना उपचार पॅकेजच्या नावाखाली ९७,५०० रुपये बिलात आकारल्याचे दिसून येते असे सांगून संदीप देशपांडे म्हणाले, जादा बिल प्रकरणी आपण महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहोत. यापूर्वीही नानावटी रुग्णालयात रुग्णांकडून जादा बिल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे राज्या सरकारने ३० एप्रिल रोजी ‘एपिडेमिक अॅक्ट १८९७’ अंतर्गत किती बिल आकारावे याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशाचा विचार करून ३० एप्रिल पासून नानावटी रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व करोना रुग्ण तसेच अन्य रुग्णांच्या बिलांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी आपण पालिका आयुक्त तसेच राज्याच्या मुख्य सचिव व प्रधान सचिव आरोग्य यांच्याकडे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

याबाबत नानावटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनप्रीत सोहेल यांना विचारले असता, “रुग्णालयाने कोणतेही जादा बिल लावलेले नाही. नियमानुसार बिल आकारणी करण्यात आली असून पालिकेच्या लेखापरीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सदर बिल बघितले” असल्याचे त्यांनी सांगितले. पाच लाखाहून अधिक बिलाची रक्कम बाकी असताना नियमानुसार हमी न घेताच मृतदेह ताब्यात कसा दिला असे विचारले असता “पैशासाठी आम्ही मृतदेह अडवत नाही तसेच हमी घेतली नाही, ही चांगली भूमिका असल्याचे” सीइओ मनप्रित यांनी सांगितले. “तसेच आम्ही आकारलेल्या बिलावर तपशीलवार चर्चा करायला तयार असल्याचे संदीप देशपांडे यांना सांगितल्याचे” मनप्रित म्हणाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.