पावसाने मुंबई कुठे तुंबली आहे? असं वक्तव्य मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी केलं होतं. खरंतर मुंबई सोमवारीही जलमय झाली होती आणि मंगळवारीही मुंबईची पावसामुळे दाणादाण उडाली. यामुळे मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा भेट म्हणून पाठवला. तुंबलेली मुंबई निदान महापौरांना या जाड भिंगाच्या चष्म्यातून तरी दिसेल असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या व्हिडिओतून मनसेने महापौरांवर निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे म्हणतात, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबईत तुंबलेलं पाणी दिसत नाही. लोकांना झालेला त्रास दिसत नाही. ते म्हणतात मी शिक्षक आहे त्यामुळे खोटं बोलत नाही. त्यांना बहुदा दिसण्याची समस्या असावी म्हणूनच आम्ही त्यांना जाड भिंगाचा चष्मा भेट म्हणून पाठवत आहोत. किमान यातून तरी विश्वनाथ महाडेश्वर यांना लोकांना झालेला त्रास, मुंबईत साठलेलं पाणी दिसू शकेल. फक्त महापौरच नाही तर ज्या नेत्यांना मुंबईची दुरवस्था दिसत नाही. समस्या किंवा लोकांचा त्रास दिसत नाही, तुंबलेलं पाणी दिसत नाही अशा सगळ्या नेत्यांना मनसेतर्फे हा चष्मा मोफत पाठवला जाईल असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे असं म्हणत मनसेने त्यांना जाड भिंगाचा चष्मा भेट म्हणून पाठवला आहे. मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे. मध्य रेल्वे सोमवारी रात्रीपासून फक्त ठाण्यापर्यंतच चालवण्यात येते आहे. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. अशात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका वाहिनीशी बोलताना  कुठे तुंबलंय पाणी असा प्रश्न विचारला होता. त्याच प्रश्नाला आता मनसेने सडेतोड उत्तर दिलं आहे.