मनसेची सरकारवर टीका; पूर्ण केलेल्या आश्वासनांची आकडेवारी उघड करण्याचे आव्हान

राज्यातील भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत लोकांची जाहिरातबाजी करून केवळ फसवणूक करण्याचेच काम केले आहे. हे कमी ठरावे म्हणून आता ‘होय, मी लाभार्थी’ची प्रचंड जाहिरातबाजी सुरू केली आहे. कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. हमीभावाचा पत्ता नाही. शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. शेकडो घोषणा निवडणुकीपूर्वी व गेल्या तीन वर्षांत करणाऱ्या फडणवीस सरकारने आता ‘होय, आम्ही फसवून दाखवले’ अशी जाहिरात केली पाहिजे, असा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. मनसेने आता राज्यव्यापी सरकारच्या फसवणूक कारभाराचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्याची तयारीही मनसेने चालविल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने सुमारे दीडशे आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात, तसेच जाहीर सभांमधून दिली होती. त्यापैकी २५ टक्के आश्वासनेही तीन वर्षांनंतर पूर्ण केली नसून हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत शासनाने घेतलेले निर्णय तसेच निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या अंमलबजावणीची माहिती आकडेवारीनिशी जाहीर करावी, असे आव्हान नांदगावकर यांनी दिले. मुंबईतील रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांच्या यशस्वी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मनसेने आता राज्यातील शेकतकऱ्यांच्या प्रश्नावरून रण पेटविण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जमाफीची घोषणा व त्याची जाहिरातबाजी करून तीन महिने उलटले तरी लाखो शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. सुरुवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे ढोल फडणवीस यांनी वाजवले. आता शेतकऱ्यांची आकडेवारी कमी कमी होत चालली आहे. कठीण अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे निम्मे शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेतून बाद होणार असल्याची भीतीही नांदगावकर यांनी व्यक्त केली. चोवीस तास विजेचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला भारनियमन करावे लागत आहे.  कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

अधिवेशनावर मोर्चा?

ऊस, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी आज संकटात सापडले आहेत. कीटकनाशक वापरणारे शेतकरी व मजूर किडय़ा-मुंग्यांसारखे मरत आहेत. एवढी वाईट परिस्थिती आघाडी सरकारच्या काळातही नव्हती. या पाश्र्वभूमीवर सरकारच्या फसवणूक कारभाराचा पंचनामा मनसे करेल, असेनांदगावकर यांनी सांगितले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याचा विचार असला तरी अद्यापि अंतिम निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.