मुंबई : सत्तेत राहून विरोधाची नौटंकी करणाऱ्या शिवसेनेचा चेहरा लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी पुरता उघडा पडला आहे. नाणारपासून महाराष्ट्राच्या विविध समस्यांवर आवाज उठवणे शक्य असतानाही १८ खासदारांना गैरहजर ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ची व महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केल्याचे जोरदार प्रत्युत्तर मनसेने दिले आहे. उद्धव ठाकरे यांची मुलाखत हा एक फुसका बार असल्याचा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला.

‘माझा पक्ष रिजनल असला तरी ओरिजिनल आहे’ असे सांगून उद्धव यांनी आपल्या मुलाखतीत मनसेवर जोरदार हल्ला चढवला होता. मनसेतून शिवसेनेत परत आलेले हे ‘ओरिजनल’ शिवसैनिक असल्यामुळे आम्ही कोणत्या पक्षाची फोडाफोड केली नाही, असा दावाही उद्धव यांनी केला. सत्तेत राहून सातत्याने भाजपला विरोध करण्याचे काम उद्धव ठाकरे हे करत असून त्याचे वर्तन हे ‘मंगळसूत्र वापरणार नाही, पण कुंकू ठेवणार’ अशा प्रकारचे असल्याचा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला. लोकांना ‘ओरिजिनल’ आणि ‘रिजनल’ यांच्याशी काहीही देणेघेणे नाही तर जो पक्ष लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर येऊन प्रश्न सोडवतो तोच आपलासा वाटेल आणि भविष्यात मनसेच लोकांचा पक्ष बनेल असेही नांदगावकर म्हणाले.

गेली चार वर्षे सरकारमध्ये असूनही आमच्या मंत्र्यांना अधिकार नाही आणि आमदारांना निधी मिळत नाही, असे म्हणाऱ्यांनी ‘शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही, सावज दमलेय’ असे म्हणणे हे हास्यास्पद आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाला विरोध करायचा आणि दुसरीकडे यांचेच मंत्री एकनाथ शिंदे सरकारला सहकार्य करत आहेत. नाणारला असलेला विरोधही असाच नाटकी आहे. उद्योगमंत्र्यांनी जमीन खरेदीची अधिसूचना रद्द केल्याचे जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस त्याची अंमलबजावणीही करत नाही आणि केंद्र सरकार करारावर करार करत आहे.

नोटाबंदीपासून अनेक गोष्टींना मीच पहिला विरोध केला असे उद्धव सांगत असले तरी त्यांना विचारतोय कोण, असा सवाल करत भाजप त्यांना हवे ते निर्णय घेत असतानाही हे सत्ता सोडण्याची हिंमत दाखवणार नाहीत हे माहित असल्यामुळेच भाजप उद्धवनीतीला फुटक्या कवडीचीही किंमत देत नाही, असेही नांदगावकर म्हणाले.