दादरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचे वाढते प्रमाण, रस्त्यावर कशीही उभी राहणारी वाहने या नेहमीच्या समस्यांबरोबरच पादचाऱ्यांसाठी पदपथच नव्हे तर रस्त्यावरूनही चालणे कठीण झाल्याने या विरोधात दादरमधील सर्व नागरिकांच्या सहकार्याने मनसेने रविवारी ‘माझा रस्ता परत द्या’ हे अभिवन आंदोलन केले. मनसेचे पालिकेतील गटनेते व नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलल्या या लोक आंदोलनात दादरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दादर-माहीममध्येही मनसेचे सुपडे साफ झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून मनसेने पक्षबांधणी तसेच स्थानिक पातळीवर वेगवेगळी आंदोलने हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या हातून मनसेने दादरचा बालेकिल्ला हिसकावून घेतल्यानंतर सेनेने दादरचा गड पुन्हा मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्याचेच फळ म्हणून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने दादर पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. तथापि दादरमधील सातही नगरसेवक हे मनसेचे असून महापालिका निवडणुकीत पुन्हा सेनेचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसेनेने वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर लोकांच्या प्रश्नांना हात घालून आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मनसेनेही वेगवेगळी आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे.
दादरमधील वाढते फेरीवाले ही सर्वासाठीच डोकेदुखी असून पालिका व पोलिसांकडून कोणताही ठोस कारवाई या फेरीवाल्यांवर होताना दिसत नाही. फेरीवाल्यांनी केवळ पदपथच नाही तर रस्तेही अडवून धरले असून शिवाजी पार्क परिसरातही आता फेरीवाले दिसू लागले आहेत. त्यामुळे मनसेचे दादरमधील नगरसेवक संदीप देशांपांडे यांनी लोकांच्या सहभागातून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दादरवासीयांना पत्र पाठवून ‘माझा रस्ता परत द्या’ या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले. रविवारी दादर पश्चिम येथील रानडे रस्त्यावर संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली  हे आंदोलन केले.