11 August 2020

News Flash

MNS : मनसेचे इंजिन यार्डातच!

राज ठाकरे यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी नऊ नेत्यांची, नऊ सरचिटणिसांची तसेच सात प्रवक्त्यांची घोषणा केली.

 

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी तयारी करत असताना मनसेचे इंजिन मात्र यार्डातून बाहेर पडण्यास तयार नाही. प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार हे जवळपास स्पष्ट झाले असून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकमेकांवर चिखलफेक करत असताना मनसेचे नगरसेवक तसेच नेतेमंडळी ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसल्यामुळे मनसेचे नेमके चाललेय काय हा प्रश्न मनसेच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.

गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत भाजपने वेळेवेळी स्थायी समितीत तसेच सभागृहात शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न केले. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील भांडवली कामांसाठीच्या तरतुदींपैकी तीस टक्केही रक्कम खर्च होत नाही. पालिका अधिनियम १८८८ अन्वये अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर दरमहा खर्चाची माहिती स्थायी समितीला सादर करणे आयुक्तांना कायद्याने बंधनकारक आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांत अशी माहिती प्रशासनाकडून कधी देण्यात आली नाही. सेना-भाजपच्या या अपयशाविरुद्ध मनसेचे गटनेते संदीप देशपांडे वगळता कुणीच आवाजही उठविलेला नाही. मुंबईतील रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार असो की पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचा विषय असो मनसेकडून प्रभावीपणे विरोध होताना दिसत नाही. नालेसफाईतील भ्रष्टाचार तसेच नालेसफाईच्या कामांची उद्घाटने होत असताना मनसेचे मुंबईतील नेतेमंडळीचा घसा बसला आहे का, असा सवाल आता मनसेचेच पदाधिकारी करताना दिसतात.

राज ठाकरे यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी नऊ नेत्यांची, नऊ सरचिटणिसांची तसेच सात प्रवक्त्यांची घोषणा केली. हे नेते आहेत कुठे, असा सवाल मनसेचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगडावर शुकशुकाट असतो, तर बहुतेक नेते व सरचिटणीस हे मुंबईतील असून किती शाखांना त्यांनी आजपर्यंत भेटी दिल्या, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले असा सवाल करत, सर्व काही राज ठाकरे यांनीच करायचे असेल तर ही नेतेमंडळी हवीत कशाला, असा नाराजीची सूरही सध्या उमटत आहे. एकीकडे मनसेमधून नाराज नगरसेवक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने पक्ष सोडत आहेत याचा पत्ताही या नेतेमंडळींना लागणार नसेल तर महापालिका निवडणुकीला तोंड कसे देणार, असा सवालही मनसेचेच पदाधिकारी व कर्याकर्ते करत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेचा ‘पाडवा’ साजरा करताना राज ठाकरे यांनी आक्रमक होण्याचा ‘आदेश’ दिला होता. मात्र पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि प्रवक्ते यांच्या कानी इंजिनाची ‘शिट्टी’ ऐकू गेलेली दिसत नाही, असे मत मांडत, मनसेचे इंजिन यार्डामधून बाहेर पडणार कधी, असा सवाल कार्याकर्त्यांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 2:37 am

Web Title: mns stay behind in preparation for upcoming corporation election
Next Stories
1 मुंबई शहरात ११ अतिधोकादायक इमारतींची घोषणा
2 ‘शिववडा’वर हातोडा
3 नवउद्य‘मी’: शेतकरी ऑनलाइन
Just Now!
X