संपावर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे आज आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत. कोस्टल रोडचं काम बंद पाडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गिरगावात मेट्रो-3 चं काम बंद पाडलं आहे. यासोबतच सायन-पनवेल महामार्गावर नवी मुंबई महापालिकेच्या बसेस अडवण्यात आल्या आहेत.

सकाळी वरळी येथे सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला. मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे कर्मचारी तसंच तेथील सर्व मशीन्स हलवण्यास भाग पाडलं. यासोबत तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळं ठोकलं. संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं सुरु करु देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी अकरा वाजता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बेस्ट संपावर चर्चा केली. बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. उच्च न्यायालयानेही संपावर नाराजी व्यक्त अशाप्रकारे मुंबईकरांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी विविध मागण्यांसाठी गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पालिका आणि बेस्ट प्रशासन तसेच शिवसेनेच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतरही या संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.