दादर- माटुंगा दरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला. जोपर्यंत रेल्वेतर्फे चर्चेसाठी अधिकारी पाठवला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा मनसे नेत्यांनी दिला आहे.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. शिवसेनेने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी अद्याप एकही नेता या आंदोलनाकडे फिरकलेला नाही. दुसरीकडे मनसेचे नेते मात्र आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘आम्ही तोडगा काढण्यासाठी इथे आलो आहे. विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी’, असे त्यांनी सांगितले. अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींसाठी नवीन परीक्षा घेणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. यावरही संदीप देशपांडेंनी टीका केली. ‘रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांवरुन चर्चा करण्याऐवजी इथे येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.