वाहतूकदारांच्या विविध समस्या तसेच मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर सोमवारी  मोर्चा काढला होता. यावेळी मनवासेच्या शिष्टमंडळाने ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
गोदीमधून निघणारी अतीजड वाहने आणि इतर मालवाहू ट्रकमधून प्रमाणित वजनापेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे. अतीजड वाहनांमुळे रस्त्यावर पडणाऱ्या खड्डय़ांचे प्रमाण वाढत चालले असून द्रुतगती महामार्गावर टायर फुटून अपघात घडत आहेत, त्यावर उपाययोजना करणे. खासगी कंपन्याकडून वेळोवेळी बुडविला जाणारा जकात कर दामदुप्पट वसूल करणे. अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात कठोर कारवाई करणे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.