शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली परळच्या नरे पार्क मैदानातील अभ्यासिका पाडून तेथे जलसंधारण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) प्रकल्प राबविण्याचा घाट मनसेने घातला असून त्याचे उद्घाटन राज ठाकरे यांच्याच हस्ते व्हावे यासाठीही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी अभ्यासिकेवर हातोडा पडू देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या प्रश्नावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे
आहेत.
परळमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिवंगत माजी आमदार विठ्ठल चव्हाण यांच्या प्रयत्नाने नरे पार्क मैदानामध्ये अभ्यासिका आणि व्यासपीठ उभारण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले होते. या अभ्यासिकेत आजघडीला विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. असे असतानाही ही अभ्यासिका जमीनदोस्त करुन त्या ठिकाणी जलसंधारणाचा प्रकल्प राबविण्याचा हट्ट मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी धरला आहे. परळ विभागात पाण्याची कमतरता असल्यामुळे या प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर अत्यावश्यक सेवेसाठी करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंग मैदानामध्ये हा प्रकल्प राबविण्याचा बाळा नांदगावकर यांचा मानस होता. मात्र तेथील रहिवाशांनी विरोध केल्यामुळे त्यांनी आता नरे पार्ककडे आपला मोर्चा वळविला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली वास्तू जमीनदोस्त करण्याचा घाट नांदगावकर यांनी घातल्याचा आरोप होत आहे.
 या संदर्भात नांदगावकर यांनी सांगितले की, या मैदानात म्युझिकल जॉगिंग पार्क, इंडोअर गेम, योगा सेंटर, कॅरम, बुद्धीबळ, व्यायामशाळा, भव्य व्यासपीठ, जलतरण तलाव आणि उर्वरित जागेत ९६ लाख लिटर पाणी उपलब्ध होईल असा जलसंधारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरुनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळाली असून सरकारकडून पैसेही मिळणार आहेत. सध्याच्या अभ्यासिकेच्या जागी भव्य वास्तू उभी करून त्याला माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची माझी इच्छा आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विठ्ठल चव्हाण यांच्या नावाच्या पाटय़ाही तेथे कायम ठेवण्यात येतील. या प्रकल्पाचे भूमीपूजन १३ ऑक्टोबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिवसैनिकांचे अराध्य दैवत असलेल्या बाळासाहेबांची स्मृती जपण्यासाठी ही अभ्यासिका कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, असा इशारा स्थानिक नगरसेवक नाना आंबोले यांनी दिला आहे.  जलसंधारणाचा प्रकल्प राबवायचा असेल तर मनसेने तो अन्य ठिकाणी राबवावा, असे आंबोले म्हणाले.
दरम्यान, या संदर्भात स्थानिक शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुखांची स्मृती जपण्यासाठी सर्वतोपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन पाटील यांनी शिवसैनिकांना दिले.
शिवसैनिकांचे अराध्य दैवत असलेल्या बाळासाहेबांची स्मृती जपण्यासाठी ही अभ्यासिका कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, असा इशारा स्थानिक नगरसेवक नाना आंबोले यांनी दिला आहे.  जलसंधारणाचा प्रकल्प राबवायचा असेल तर मनसेने तो अन्य ठिकाणी राबवावा, असे आंबोले म्हणाले.