महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भांडुप येथील प्रस्तावित ‘थीम पार्क’ मीठागराच्या जागेवर उभारले जात असल्याच्या शिवसेनेच्या आरोपामुळे निर्माण झालेल्या वादाच्या सावटात या मनसेच्या या बहुचर्चित ‘थीम पार्क’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवारी झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना त्यांनी भाषणही करणे टाळले.
‘माझे जग’ नावाच्या या थीम पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी ११ वाजता भांडुपेश्वर कुंड येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास राज ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहचले. या प्रकल्पासाठी प्रयत्न करणारे स्थानिक आमदार मंगेश सांगळे, आमदार शिशिर शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रकल्पाची चित्रफीत दाखविण्यात आल्यानंतर राज ठाकरे व्यासपीठावरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते. मात्र एरवी सभा गाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांनी भाषण करणे टाळल्याने श्रोत्यांचा हिरमोड झाला. बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही राज यांनी टाळले. माजी महापौर दत्ता दळवी व सुमारे १०० शिवसैनिक कार्यक्रम रोखण्यासाठी आले होते. त्यांना पोलिसांनी दूरवरच रोखल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते-शिवसैनिकांमधील संभाव्य संघर्ष टळला. ही जागा मिठागाराची नसून राज्य सरकारची आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. द्वेषापोटी शिवसेनेचे दत्ता दळवी हे या प्रकल्पाला विरोध करत असल्याची टीका आमदार सांगळे यांनी केली.
 
कुंड सुशोभिकरणाला मंजुरी
भांडुपेश्वर कुंडाच्या आसपासच्या २० हजार चौरस मीटर जागेवर ‘थीम पार्क’ उभारण्याची घोषणा मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी दोन दिवसांपूर्वी केली. मात्र कुंडाच्या आसपासची जागा मिठागर आयुक्तालयाच्या ताब्यात आहे. ही जागा सरकारलाहीहस्तांतरित करण्यात आलेली नाही. मिठागर आयुक्तालयाच्या ताब्यात जागा असताना आणि कसलेही आराखडे तयार नसताना मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी ‘थीम पार्क’ उभारण्याची घोषणा केल्याचा आरोप माजी महापौर व शिवसेनेचे स्थानिक नेते दत्ता दळवी यांनी केला. जिल्हा नियोजन खात्याने भांडुपेश्वर कुंडाच्या सुशोभिकरणासाठी परवानगी दिली असून त्यासाठी निधीही दिला आहे. या संदर्भात जिल्हा नियोजन खात्याने दिलेल्या पत्रामध्ये ‘थीम पार्क’चा ओझरता उल्लेखही नाही, असे दळवी म्हणाले. या संदर्भात मिठागर आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्याला पत्र सादर केले आहे. येथे थीम पार्क उभारण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे या पत्रामध्ये स्पष्ट म्हटल्याचा दळवी यांचा दावा आहे.