News Flash

मनसेसाठी अस्तित्वाची लढाई

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली मुंबईतील एकमेव ईशान्य मुंबईची जागाही भाजपाने हिरावून घेतली.

| July 26, 2014 04:45 am

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली मुंबईतील एकमेव ईशान्य मुंबईची जागाही भाजपाने हिरावून घेतली. मानखुर्द- शिवाजीनगरचा अपवाद वगळता मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर(पूर्व) घाटकोपर (पश्चिम) या पाचही विधानसभा मतदार संघात महायुतीला ६० टक्के पेक्षा अधिक मते मिळाल्याने या मतदार संघांवर भगवाच फडकणार अशी स्वप्ने महायुतीच्या डोळ्यात तरळत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ही स्वप्ने पुसण्याचे आव्हान पेलून राष्ट्रवादी काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवून द्यावे लागणार आहे, तर आहेत त्या तीन जागा टिकवून ठेवण्यासाठी ‘करो वा मरो’ची लढाई ‘मनसे’ला लढावी लागणार आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघांचे हे प्राथमिक चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील यांनी पुन्हा एकदा आमदारकीसाठी मतदार संघाचा शोध सुरू केला आहे. तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी आपली जागा कायम राखण्यासाठी कामाला लागले आहेत. मनसेला मात्र महायुती आणि राष्ट्रवादीशी मुकाबला करावा लागणार आहे.
विधानसभा मतदारसंघांतील चित्रमुलुंड- आजवर भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख असून १९९९ पासून भाजपचे सरदार तारासिंग त्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मुलुंड- पूर्व- पश्चिमेचा भाग, मुलुंड कॉलनी, वैशाली नगर, सिंधी कॉलनी असा असा परिसर या मतदार संघात येत असून वनजममिनीचा आणि डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा प्रश्न या विधानसभा मतदार संघात महत्वाचा आहे. नगरसेवक असल्यापासून तारासिंग यांची या मतदार संघावर घट्ट पकड असून सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला आमदार अशीही त्यांची ओळख आहे गुजराती आणि मराठी असे दोन्ही मतदार सिंग यांना मानणारे असल्याने या मतदार संघात तिकीट मिळविण्यासाठी भाजपातील दावेदार मात्र वाढू शकतात.
भांडुप (पश्चिम)- टेंभीपाडा, हनुमान नगर, कोकणनगर, गांधीनगर, नाहूर आदी भाग या मतदार संघात येत असून सध्या मनसेचे शिशिर शिंदे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवाजी तलावाचे सुशोभिकरण आणि नाहूर येथे रूग्णालय उभारण्यासाठी शिंदे गेली पाच वर्ष सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मिठागरे आणि वनजमिनीवरील अतिक्रमणांचा महत्वाचा प्रश्न या मतदार संघात असून  निवडणुकीत तोच प्रचाराचा  मुख्य मुद्द ठरू शकतो. पाण्य़ाचा प्रश्नही येथे प्रकर्षांने जाणवतो.  
विक्रोळी- म्हाडा कॉलनी, भांडूप गांव, कांजुर, नेहरू नगर, टागोर नगर, फ्रेंडस कॉलनी, दातार कॉलनी, कन्नमवार नगर आदी भागात हा मतदार संघ विस्तारलेला असून मराठी बरोबरच मुस्लीम आणि हिन्दी भाषिक मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. एलबीएस मार्गाचे रूंदीकरण, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आदी महत्वाचे प्रश्न असून मनसेचे मनसेचे मंगेश सांगळे सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
घाटकोपर (पूर्व)- घाटकोपर पूर्व हा भाजपाचा आणखी एक गड मानला जातो. प्रकाश मेहता हे सातत्याने तेथून निवडून येत असून पंतनगर, विद्याविहार, म्हाडा वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, पोलीस वसाहत, छेडा नगर अशा मोठय़ा वसाहती या मतदार संघात आहेत. गुजराती आणि दलित मतदार या मतदार संघात मोटय़ाप्रमाणात आहे. राजावाडी रुग्णालय वगळले तर या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान एकही मोठे सार्वजनिक रूग्णालय नाही. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न या मतदार संघात सर्वात महत्वाचा आहे.
घाटकोपर (पश्चिम)- मनसेचे राम कदम येथे आमदार असून विकास कामांपेक्षा या भागातील लोकांना देवदर्शन घडवून आणण्यात तसेच दहीहंडी सारखे सार्वजनिक आणि लोकप्रिय उपक्रम राबविणारे आमदार अशी त्यांची ओळख आहे. भटवाडी, विद्याविहार, पार्कसाईट, असल्फऱ आदी भाग या मतदार संघात येत असून मराठी आणि मुस्लीम मतदारांचे येथे प्राबल्य आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी आणि डोंगराळ भागातील पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून मेट्रोने आता काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर –  मुस्लीम आणि हिन्दी भाषिक मतदारांचा गड असलेल्या या मतदार संघाचे प्रतिनिधित्व समाजवादी पार्टीचे आबू आसिम आझमी करतात. गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, एमएमआरडीए वसाहत आदी परिसरात हा मतदार संघ पसरलेला असून पायाभूत सुविधांचाही येथे मोठय़ा प्रमाणात वानवाच आहे. सार्वजनिक आरोग्याचीही सुविधा नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा मतदार संघ आघाडीसोबत राहिला. अन्य पाचही मतदार संघांमध्ये पन्नास हजार ते एक लाखाचे मताधिक्य घेणाऱ्या किरीट सोमय्या यांना या मतदार संघात मात्र २० हजारांच्या पिछाडीवर राहावे लागले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने हा सुरक्षित मतदारसंघ असून त्यासाठी दोघांमध्ये लढाई होण्याची शक्यता अधिक आहे.
दिग्गजांची कसोटी
लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार न दिल्याने किरीट सोमय्या यांना फायदा झाला होता. प्रामुख्याने मराठी, गुजराती, दलित, मुस्लीम मतदार अशा संमिश्र स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे. येथे  ४०.४८ टक्के मराठी,१२.२५ उत्तर भारतीय, १४ टक्के मुस्लीम तर १० टक्के गुजराती मतदार आहेत. मागील निवडणुकीत मुलुंड आणि घाटकोपर पूर्व भाजपाच्या तर  तर मानखुर्द-शिवाजीनगर समाजवादी पार्टीच्या ताब्यात आहे. भांडूप, विक्रोळी, घाटकोपर येथील मराठी मतदार गतवेळी मनेसेसह तर मुलुंड व घाटकोपर पूर्व भागात गुजराती मतदार भाजपासह राहिला होता.  रेल्वे प्रवाशांच्या समस्या, डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य सुविधांची वानवा, जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास असे येथील काही महत्वाचे प्रश्न आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 4:45 am

Web Title: mns to fight for existance
टॅग : Mns
Next Stories
1 वनाधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन बिबट्या पसार!
2 पीपल्स सोसायटीवर प्रकाश आंबेडकरांचे वर्चस्व?
3 मुंबईत लेप्टोचा पहिला बळी
Just Now!
X