घरात मांसाहार शिजवल्याने नाटय़ निर्माते गोविंद चव्हाण यांच्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीची दखल घेत मनसेने मुंबईच्या गुजराती वस्त्यांमध्ये मांसाहाराची मोफत भोजनावळ घालून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडय़ातील या आंदोलनामुळे मनसे विरुद्ध गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दहिसरमधील ‘बोना व्हेंचर’ इमारतीमध्ये राहणारे गोविंद चव्हाण यांच्या घरी गेल्या आठवडय़ात मांसाहार शिजविल्याबद्दल येथील गुजराती-जैन रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले, तसेच मारहाणही केली होती. चव्हाण कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत शिवसेना आणि मनसेने आंदोलनही केले होते. आता मनसेतर्फे पुढील आठवडय़ात मुंबईतील गुजराती वस्त्यांमध्ये मांसाहाराची मेजवानी घडविण्यात येणार आहे.
मुंबईमधील मनसेच्या शाखा अध्यक्षांची एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्यास उपनगरांतील मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर कोळी महोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र त्याचा परिणाम केवळ एकाच विभागात होईल, असे मत पडले आणि हा प्रस्ताव रहित करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण मुंबईतील आंदोलन करण्यावर सर्वाचे एकमत झाले. ठिकठिकाणच्या गुजराती वस्त्यांमध्ये मांसाहारींना मोफत भोजनावळ घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनासाठी कोलंबी भात आणि कोंबडी वडय़ांचा सुग्रास बेत आखण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात हे आगळेवेगळे आंदोलन करून चव्हाण कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्यांना दणका देण्याची तयारी मनसे करीत आहे. त्यामुळे खळ्ळखटय़ाक नंतर आता मुंबईमध्ये मांसाहार भोजनावळीच्या या आंदोलनावरून भडका उडण्याची चिन्हे आहेत.
दहिसरमधील त्या प्रकाराविरोधात शिवसेना, स्वाभिमानी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले होते.