लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मनसे मुंबईसह राज्यात साफ झाल्यामुळे मराठीचे कार्ड पुन्हा एकदा चालविण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील नवीन निवासी प्रकल्प अथवा गृहनिर्माण संकुलांमध्ये मांसाहार करणाऱ्यांना वेगवेगळ्या कारणांखाली सदनिका विकण्यास नकार देणाऱ्या बिल्डरांविरोधात मनसेने मोहीम हाती घेतली आहे. अशा विकासकांना बांधकाम सुरू करण्याची (सीसी) परवानगी देऊ नये, अशी ठरावाची सूचनाच मनसेने महापालिका सभागृहात मांडली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून पुण्याच्या दौऱ्यावर जात असतानाच महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ‘जात, धर्माच्या आधारावर तसेच मांसाहार करणाऱ्यांना फ्लॅट विक्री करण्यास नकार देणाऱ्या विकासकांवर पालिकेने ना पसंतीची सूचना बजावत त्यांना बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देऊ नये, अशी ठरावाची सूचना पालिका सभागृहात मांडली आहे.अशा विकासकांनी जागा विक्रीची खोटी माहिती दिल्याचे म्हणजेच एखाद्याला जागा नसल्याचे सांगून त्यानंतर विक्री केल्याचे उघडकीस आल्यास त्याविरोधात कारवाई केली पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसेची ही सूचना सभागृहात मंजुरीसाठी आल्यानंतर शिवसेनेलाही ‘मराठी बाणा’ दाखवत या ठरावाला पाठिंबा द्यावा लागेल, अशी शक्यता आहे.