मोठा गाजावाजा करत आणि ‘हिंमत असेल तर मला अडवा आणि अटक करा’ अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा करत मनसेने राज्यव्यापी पुकारलेल्या टोल आंदोलनाचा बार फुसकाच निघाला. निवडणुका आल्या म्हणजे मनसे असली अटकनाटय़े करते. परंतु या नाटकाला प्रेक्षकच न लाभल्यामुळे हे नाटक साफ आपटले, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेने सातत्याने टोलविरोधात आवाज उठवला. कोल्हापूर येथेही शिवसेनेने आंदोलने केली. मनसेच्या ‘अटक मटक राज नाटक’चा पर्दाफाश यापूर्वीच शिवसेनेने केल्याचे संजय राऊत म्हणाले. मनसेच्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा नव्हता हे पुरते स्पष्ट झाले. महामार्ग रोखण्याच्या घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात सर्वत्र वाहतूक सुरळीत चालू होती. मनसेचे आंदोलन हे सरकारपुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांनी केला.

राज यांची सरकारची हातमिळवणी -भाजपची टीका
मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करणे, ही तर राज ठाकरे यांची सरकारशी हातमिळवणी असल्याचे टीकास्त्र भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सोडले आहे. आंदोलनामुळे महामार्ग, टोलनाक्यांवर व अन्य ठिकाणी झालेल्या नुकसानीची भरपाई मनसेकडून सरकार वसूल करणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.सरकार व मनसेमध्ये हातमिळवणी असल्याचे राज ठाकरे यांच्या पुणे येथील सभेपासूनच दिसून येत होते. कोल्हापूर येथे टोलविरोधी आंदोलन सुरू आहे. त्यांच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी किती चर्चा केल्या? इंदू मिल येथे डॉ. आंबेडकरांचे स्मारक, राजू शेट्टी यांचे ऊसदराबाबतचे आंदोलन दीर्घकाळ होऊनही आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली नाही. मग राज ठाकरे यांच्याशी लगेच चर्चा कशी होते? यावरूनच ही हातमिळवणी असल्याचे दिसून येते, असे भंडारी म्हणाले.