गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चा सुरू आहे ती लोकल प्रवासाची. गेल्या दीड वर्षापासून राज्यात करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. अजून देखील फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर आता या मागणीवर अंमलबजावणी न झाल्यास रेलभरो आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता मुंबईतलं वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देखील लोकल प्रवासाविषयीच्या मुद्द्यांची चर्चा करण्यात आली. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी देखील मागणी पुढे आली. मात्र, यासंदर्भात दोन डोस झालेल्या नागरिकंची नोंद आणि त्याचं व्यवस्थापन हा भाग रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून अंतिम निर्णय घेतील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती!

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यावरून आता राज्य सरकारला इशारा देणारं ट्वीट केलं आहे. “ज्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, राज ठाकरेंच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती. नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावं लागेल”, असं संदीप देशपांडे यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

माझा पक्ष मुंबईकरांसोबत उभा राहील

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असं राज ठाकरे म्हणाले होते. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा सुरु करावी. निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा लोकांना तरी लोकल प्रवासाचा लाभ घेता येईल आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल, असे निर्णय घ्यावेत अशी मागणी राज यांनी केली होती.