राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती व पक्षाच्या वाटचालीचा विचार करता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करण्याची तयारी चालवल्याची माहिती समोर येत आहे. मनसे आपल्या झेंड्याचा रंग बदलणार असून, आता भगव्या रंगाचा झेंडा होणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे.

एवढेच नाहीतर झेंड्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील असणार असुन, लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे आपल्या नव्या रंगातील झेंड्याचे अनावरण करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

माध्यमांवरील बातम्यांमुळे राज्यभरातील कार्यर्त्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहचील आहे. तसेच, रंग बदलाच्या पार्श्वभूमीवर मनसे आता मराठीच्या मुद्यावरून हिंदुत्वाच्या मुद्याकडे वळणार की काय? असा देखील प्रश्न अनेकांना पडत आहे. सध्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा व हिरवा असे तीन रंग आहेत. २३ जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. यावेळी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.