सांताक्रूझ येथील वाईल्ड क्राफ्ट कंपनीमध्ये  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘खळ्ळ खट्याक’ आंदोलन केले. मनसे कार्यकर्ते थेट वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या कार्यालयात घुसले व त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण सुरु केली.

आपल्या कृत्याचे समर्थन करताना मनसेने कंपनीमध्ये व्यवस्थापनाकडून कामगारांची पिळवणूक सुरु असल्याचा आरोप केला आहे. वाईल्ड क्राफ्ट ही बॅग बनवणारी कंपनी आहे. कंपनीतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता कंत्राटावर घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे.

कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कंत्राटावर का नेमले ? याचा  जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते तिथे गेले होते. अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर  त्यांना मारहाण केली असे राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. शाब्दीक वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. वाईल्ट क्राफ्टने कायमस्वरुपी कामागारांना कंत्राटी तत्वावर घेतल्याने पन्नास कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची भूमिका योग्य आहे असे मनसे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. या मारहाण प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.