मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी कायदा हातात घेऊन चोख प्रत्युत्तर द्या, अशी भाषा करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरुद्ध रविवारी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण देऊन फेरीवाल्यांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. काल मालाड येथे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्यासाठी गेलेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी काही जणांनी माळवदे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले. तसेच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये माळवदे यांच्या डोक्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्याचं संजय निरूपम यांनी ‘जैसी करनी वैसी भरनी’ म्हणत समर्थन केलं होतं. तसेच मालाडमध्ये निरूपम यांनी कोणतीही परवानगी न घेता सभा घेतली होती. त्यामुळे निरूपम यांच्यावर विनापरवानगी सभा घेणे आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं मालाड पोलिसांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संजय निरूपम यांनी जाहीर सभेत काही चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, हे ठरवण्याचा मनसेला अधिकार नाही. ज्यावेळी फेरीवाल्यांना मारहाण होत होती, त्यावेळी पोलीस गप्प बसले होते. त्यामुळे यापुढेही मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला तर तुम्हीही मागेपुढे पाहू नका, असे त्यांनी म्हटले होते.

अनधिकृत फेरीवाल्यांकडून मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही- नितेश राणे

तत्पूर्वी निरूपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनसेशी लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला चर्चगेट येथील सभेत फेरीवाल्यांना हटवण्याची धमकी दिली. मात्र, त्यानंतर सरकारने मनसेविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात बांगड्या भरून बसले आहेत का?, असा बोचरा सवाल निरूपम यांनी विचारला होता. सरकार आणि पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते गरीब फेरीवाल्यांवर हल्ले करत आहेत. मात्र, सरकार आणि पोलीस शांतपणे हा तमाशा बघत आहेत. मनसेच्या या खळ-खट्याकला मुख्यमंत्री आणि पोलिसांचा छुपा पाठिंबा होत असल्यामुळेच हे शक्य होत असल्याचा आरोप यावेळी निरूपम यांनी केला होता.

मनसेने फेरीवाल्यांऐवजी सीमेवर जाऊन पाकच्या सैनिकांना मारावे : आठवले