‘मेट्रो-३’च्या निमित्ताने मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा घाट उधळून लावण्याचा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी देताच मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळ्ळखटय़ाक सुरू केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आरे कॉलनीमधील ‘मेट्रो-३’च्या कारशेडसाठी उभारलेल्या कार्यालयाची तोडफोड केली.
‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने घेतला आहे. या कारशेडसाठी अनेक झाडांची कत्तल करावी लागणार आहे. येथील वृक्षवल्ली वाचविण्यासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसमवेत गेल्याच आठवडय़ात आंदोलन केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोमवारी जाहीर सभेमध्ये ‘मेट्रो-३’मुळे मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.
त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘मेट्रो-३’च्या कारशेडसाठी उभारलेल्या कार्यालयावर दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली.