मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका आदेशासरशी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूरसह राज्यातील टोलनाक्यांवार मनसेच्या कार्यकर्त्यांची धाड पडली. पाहाता पाहाता अनेक टोल नाके फुटले आणि आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्राच्या ‘राज’कीय नकाशावर पुन्हा एकदा मनसे दिसू लागली. राज यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर सुरू झालेल्या ‘टोलफोडी’च्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर विधी व न्याय खाते राज यांच्या भाषणाची तपासणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर ‘आप’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  मोफत पाणी आणि विजेचा शॉक दिला. त्यामुळे महाराष्ट्रात जागे झालेल्या शिवसेनेने कोल्हापूर येथे टोलनाका पेटवला. त्यापाठोपाठ भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनीही आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राज्यात सत्तेवर आल्यास टोल बंदीची घोषणा केली. याला उत्तर म्हणून तुम्ही सत्तेवर आल्यावर काय कराल ते कराल परंतु मी आत्ताच ‘करून दाखवतो’ असा पवित्रा घेत नवी मुंबईतील कार्यक्रमात राज यांनी ‘टोल फोड’चे आवाहन करताच मध्यरात्रीच राज्यभरात जागोजागी मनसेचे कार्यकर्ते टोल नाक्यावर पोहचले. मुंबईत दहिसर येथे मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे, संजय घाडी यांच्यासह तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तर पुणे येथे रूपाली ठोंबरे, कल्याण येथे आमदार प्रकाश भोईर यांच्यासह जागोजागी टोलविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटप्रसंगी राज यांनी ‘टोलवसुली कशासाठी केली जाते हे जर सरकार सांगणार नसेल तर टोल भरू नका, असे मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगतानाच कोणी आडवा आला तर त्याला तुडवा, गाडय़ा थांबल्या तरी चालेल, वाहतूक कोंडी झाली तरी चालेल’ असा आदेश दिला. ‘राज’ आदेशानंतर राज्यातील टोलनाक्यांवर मनसेने केलेल्या ‘टोलफोड’ आंदोलनाने वाहतुकीची एकच कोंडी झाली. मुंबई, ठाणे, एक्स्प्रेस हायवेवर खालापूर, पुण्यात तळेगाव टोलनाका, चांदणीचौक, नाशिक, तसेच औरंगाबादसह मराठवाडय़ात, नागपूर आणि सांगलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मराठवाडय़ात जालनारोड, बीड-नगर रोडवरील आष्टी टोलनाका, नांदेड-बिलाली रोडवर मनसेच्या आंदोलनामुळे टोलवसुली बंद पडली.
राज यांच्या आदेशानुसार दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली महाराष्ट्रातील ४० टोल नक्यांवरील गाडय़ांची मोजदाद मनसेच्या सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांनी १५ दिवस केली होती. अनेक टोल नाक्यांवर किती तरी जास्त पैसे गोळा करण्यात आल्याचे राज यांनी दाखवून दिले होते.  मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोल संदर्भात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर राज यांनी आंदोलन मागे घेतले.
त्यानंतर मनसेने न्यायालयातही टोलविरोधी लढा सुरू केला. मात्र सरकारच्या टोलधोरणात पारदर्शकता नाही आणि लोकांची लूटमार लक्षात घेऊन राज यांनी टोलविरोधी आंदोलनाचे  रणशिंग फुंकले आणि महाराष्ट्रातील सर्व टोलनाके हलले.

ठाण्यात कार्यकर्त्यांना अटक
ठाणे:घोडबंदर येथील टोलनाका फोडल्याप्रकरणी मनसेच्या नऊ कार्यकर्त्यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये मनविसेचे शहराध्यक्ष संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सौरभ नाईक, अजय फाळे, नीलेश चौधरी, संतोष निकम, मनोज ठाकूर, प्रबोधन इंदूलकर, विक्रांत अडसुळे यांचा समावेश आहे. ठाणे न्यायालयाने प्रत्येकाची १५ हजार रुपयांच्या रोख जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान, आनंदनगर येथील टोलनाका फोडल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नवघर पोलिसांनी संदीप पाचंगे, मनोज ठाकूर, पुष्कर विचारे आणि नीलेश चौधरी यांना ताब्यात घेतले आहे. वाशी टोलनाका फोडल्याप्रकरणी विशाल शिंदे, देव प्रसाद, रवी शिंदे, राहुल वाघमारे या चौघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.