19 February 2020

News Flash

एटीएमची ‘रोखस्थिती’ सांगणारे संकेतस्थळ

अनेकांना आपल्या परिसरातील एटीएमबद्दल अपुरी माहिती आहे.

एटीएमची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे बोधचिन्ह.

उद्यमी तरुणांकडून नागरिकांचे हाल कमी करण्यासाठी उपाय

चलनकल्लोळामुळे एटीएमसमोर किंवा बँकांसमोर दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर रोख रक्कम नाही म्हणून अनेकांना परतावे लागत आहे; तर अनेकांना आपल्या परिसरातील एटीएमबद्दल अपुरी माहिती आहे. या सर्व परिस्थितीवर काय उपाय असू शकेल, असा विचार करीत असतानाच मंजुनाथ तलवार आणि अभिजीत खासनीस या दोन नवउद्यमींनी दोन दिवसांमध्ये CashNoCash.com नावाचे संकेतस्थळ सुरू केले आणि देशभरातील एटीएमचा तपशील एकत्रित उपलब्ध करून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानंतर ९ नोव्हेंबरपासून देशभरात नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. १० नोव्हेंबर रोजी सकाळी बँका उघडण्यापूर्वीच लोकांनी रांगा लावल्या होत्या. ही रांग आणि नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढूच लागला.

दोन दिवसांनी सुरू झालेल्या एटीएमसमोरही तास-दोन तास उभे राहिल्यानंतर रोख उपलब्ध नाही म्हणून अनेकांना परतावे लागत होते. यासाठी आपल्या परिसरात कोठे एटीएम उपलब्ध आहेत, तेथे किती गर्दी आणि रोख उपलब्ध आहे की नाही याचा तपशील देणारी यंत्रणा असणे आवश्यक असल्याचा प्रश्न मंजुनाथ आणि अभिजीत यांना पडला. त्यांनी त्यावर अभ्यास केला असता ही माहिती सरकारी यंत्रणा, बँका किंवा एटीएमचालकांनी उपलब्ध करून दिली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

गर्दीच्या वेळी सर्वाना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आपणच पुढाकार घेऊन एखादे संकेतस्थळ सुरू करावे, असा निर्णय झाला आणि अवघ्या काही तासांत ‘कॅश नो कॅश’ हे संकेतस्थळ उभे राहिल्याचे अभिजीतने ‘लोकसत्ता’ला सांगितले. हे संकेतस्थळ सुरू करताना ते वापरण्यास सोपे असावे आणि याचा बहुतांश तपशील हा वापरकर्त्यांकडूनच यावा या उद्देशानेच तयार करण्यात आले. हे संकेतस्थळ वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लॉगइन करायची आवश्यकता नसून केवळ तुमचे ‘लोकेशन’ सांगणे बंधनकारक आहे. हे ‘लोकेशन’ कळल्यावर आसपासच्या एटीएमचा तपशील आपल्यासमोर येतो. जर लोकेशन सांगायचे नसेल तर आपण पिनकोड क्रमांक देऊन एटीएमचा शोध घेऊ शकतो. त्याचबरोबर त्या एटीएमसमोर रांग आहे का? तेथे रोख उपलब्ध आहे की नाही, हा तपशीलही समोर येतो. यातील गर्दी व रोखीचा तपशील हा वापरकर्त्यांकडून मागविला जातो. हा तपशील देण्यासाठी ग्राहकांना एका क्लिकचा पर्याय देण्यात आल्याचेही अभिजीत यांनी स्पष्ट केले.

मंगळवार रात्रीपर्यंत देशातील २० टक्के एटीएमच्या गर्दीचा आणि रोखस्थितीचा तपशील सातत्याने अद्ययावत होत होता. तसेच वापरकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे हा तपशील अद्ययावत होण्याचे प्रमाणही वाढेल.

अभिजीत खासनीस

First Published on November 16, 2016 1:55 am

Web Title: mobile app for atm cash position
Next Stories
1 रेल्वेच्या पेट्रोल वाहतुकीत वाढ
2 बँकांचा वेढा कायम!
3 सध्या पोलिसांनाच संरक्षणाची गरज!
Just Now!
X