राज्य परिवहन विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
शहरातील सार्वजनिक वाहतूक दिवसेंदिवस खिळखिळीत होत चालल्याने काही वर्षांत अचानक ‘भाव’ वाढलेल्या टॅक्सीचालकांचा उद्घटपणा, उर्मटपणा आणि असभ्यपणा
वाढत आहे. याच धर्तीवर अशा मुजोर टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहे. यासाठी ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात येणार असून, त्यावरून प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.
सध्या मुंबई व उपनगरात सुमारे ४० ते ४२ हजार काळीपिवळी, सात ते आठ हजार खासगी आणि अ‍ॅपबेस टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. यातून सुमारे १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रवासी संख्या अधिक आणि वाहनांची संख्या कमी असल्याने टॅक्सीचालकांचा ‘भाव’ वाढला आहे. परिणामी, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अशा चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. याच धर्तीवर अशा चालकांवर चाप बसावा यासाठी राज्य परिवहन विभागाकडून पहिल्यादाच अत्याधुनिक अ‍ॅप्लिकेशन तयार केले जात आहे.
या अ‍ॅपच्या आधारे प्रवाशांना मुजोर टॅक्सीचालकांविरोधात तातडीने तक्रार नोंदवता येणार आहे. वाहनचालकांसह टॅक्सीचे छायाचित्र, गाडीचा क्रमांक आणि ठिकाणाच्या नावाच्या आधारे तक्रार नोंदवता येणार आहे. अशा चालकांविरोधात तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या मुजोर चालकांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी १८००-२२-०११० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहे. याच जोडीला आता अ‍ॅप्लिकेशनमुळे प्रवाशांना मदत होण्यासह मुजोर टॅक्सीचालकांवर अंकुश बसेल, असा दावा आरटीओ अधिकारी करीत आहेत. गेल्या वर्षी एका परदेशी प्रवाशांकडून टॅक्सीचालकाने एक किलो मीटरच्या अंतरासाठी तब्बल ५०० रुपये आकारले होते. यानंतर त्या चालकांचा परवाना रद्द करण्यात आला होता.

या संदंर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे यावर लवकर निर्णय होईल, असे वाटते. या अ‍ॅप्लिकेशनमुळे प्रवाशांना मुजोर चालकाविरोधात तक्रार करणे सोपे जाईल.
– दिवाकर रावते, परिवहनमंत्री