|| शैलजा तिवले

राज्यातील पहिला प्रयोग

मुंबई : टाळेबंदी आणि करोनामुळे गेल्या वर्षभरात तपासणीसाठी पोहचू न शकलेल्या पालघर जिल्ह्यतील एचआयव्हीबाधितांसाठी मुंबई एड्स नियंत्रण प्राधिकरणाने (एमडॅक्स) मोबाइल एआरटी सेंटर सुरू केले आहे. यामुळे रुग्णांना जवळच्या ठिकाणी सर्व तपासण्यांची सुविधा उपलब्ध होणार असून राज्यात प्रथमच असा प्रयोग केला जात आहे.

वसई-विरारसह पालघर जिल्ह्यंत एकही अ‍ॅण्टी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रच नाही. त्यामुळे येथील जवळपास दोन हजार एचआयव्हीबाधित रुग्ण मुंबईतील एआरटी केंद्रावर उपचारासाठी येतात. टाळेबंदीदरम्यान उपचारासाठी येणे शक्य नसल्याने जवळच्या केंद्रावरून त्यांना औषधे उपलब्ध केली गेली. परंतु एचआयव्हीबाधितांना केवळ औषधे देणे पुरेसे नसते. वर्षांतून एकदा रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती, आजाराची तीव्रता यांच्या चाचण्या करणे गरजेचे असते. त्यानुसार औषधांमध्ये बदल केले जातात. तसेच या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे इतर आजारांचे निदानही वेळेत करणे आवश्यक असते. यासाठी लघवी, मधुमेह, रक्ताच्या विविध चाचण्याही वारंवार कराव्या लागतात. या चाचण्या एआरटी केंद्रामध्ये केल्या जातात. परंतु यातील बहुतांश रुग्ण करोनाच्या भीतीने नियमित एआरटी केंद्रात उपचारासाठी आलेले नाहीत. रेल्वेच्या वेळा १२ ते ४ असल्याने हे रुग्ण अनेकदा दुपारी पोहचतात. परंतु रुग्णालयातील एआरटी केंद्रात तपासण्या सकाळच्या वेळेतच केल्या जातात. त्यामुळे रुग्णांना सकाळी सातपासून येऊन बसावे लागते. रुग्णांची अशी गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्याने एमडॅक्सने मोबाइल एआरटी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालघर जिल्ह्यतील दोन हजारपैकी सुमारे ७०० हून अधिक रुग्णांच्या तपासण्या झालेल्या नाहीत. केवळ औषधेच घेत असल्याचे लक्षात आले. रुग्णांना करोना काळात पोहोचणे शक्य नसल्यामुळे मोबाइल एआरटी केद्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा उपक्रम शनिवारपासून सुरू केला आहे. पहिलेच शिबीर विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शनिवारी झाले. गर्दी होऊ नये यासाठी ठरावीक रुग्णांना फोन करून वेळ देऊन बोलावले होते. तरी आम्ही येणार ही माहिती मिळाल्याने आणखी १७ रुग्ण तपासणीसाठी आले होते. आम्हाला वर्षभरात कोणत्याच डॉक्टरने तपासले नाही, अशी प्रतिक्रिया सर्व रुग्णांनी दिली.

काय आहे मोबाइल एआरटी सेंटर?

मोबाइल एआरटी सेंटरमध्ये एआरटी केंद्राप्रमाणे तपासणीसह सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या असतील. यात डॉक्टर, फार्मासिस्ट, समुपदेशक, तंत्रज्ञ यांसह व्हायरल लोडसह सर्व चाचण्या करण्यासाठी सुविधाही जवळील प्रयोगशाळेच्या मदतीने उपलब्ध असेल. दर शनिवारी वसई, नालासोपारा आणि विरार येथे आलटूनपालटून हे मोबाइल सेंटर सेवा देण्यासाठी पाठविले जाईल, असे एमडॅक्सच्या प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.