स्पेक्ट्रमच्या खरेदीमुळे मोबाइल कंपन्या कॉलचे दर वाढविणार अशी चर्चा सुरू असतानाच टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय) रोमिंगचे दर कमी करण्याचे कंपन्यांना सांगितले आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी १ मेपासून होणार आहे.
नवीन दरांनुसार रोमिंगमध्ये असताना स्थानिक कॉलसाठी एका मिनिटाला ०.८० पैसे आकारले जाणार आहेत; तर येणाऱ्या फोनसाठी ०.४५ पैसे आकारले जाणार आहेत. यापूर्वी हे दर अनुक्रमे १ रुपया आणि ०.७५ पैसे इतके होते. नवीन दरानुसार लघु संदेशासाठी २५ पैसेच मोजावे लागणार आहेत हे दर यापूर्वी एक रुपया इतके होते. याचबरोबर रोमिंगमध्ये असताना एसटीडी कॉल करावयाचा असेल तर यापूर्वी एका मिनिटासाठी दीड रुपया मोजावा लागत होता तोच दर आता १.१५ रुपया असा होणार आहे. तर एसटीडी लघुसंदेशासाठी दीड रुपयांऐवजी ०.३८ पैसे मोजावे लागणार आहेत. मोबाइल कंपन्या ट्रायने दिलेल्या नवीन दरांपेक्षा कमी दरात सेवा उपलब्ध करून देऊ शकतात मात्र त्यापेक्षा जास्त दर आकारू शकत नाही. रोमिंगमधील दरांची कमाल मर्यादा कमी केल्यामुळे लाखो ग्राहकांना त्याचा फायदा होईल अशी आशा ट्रायचे सचिव सुधीर गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.