महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेने या वर्षी शिवाजी पार्क व परिसरात मोबाइलसाठी शंभर ठिकाणी चार्जिग पॉइंट देण्याचे ठरवले आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय गर्दीवर नजर ठेवण्यासाठी दोन बलून, ४५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि थेट प्रक्षेपणासाठी १७ व्हिडीओ कॅमेऱ्यांसह पाच प्लाझ्मा टीव्ही व पाच एलईडी स्क्रीनचीही व्यवस्था आहे.
६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याच्या सर्व भागांतून मुंबईत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेकडून ५ ते ७ डिसेंबरदरम्यान व्यवस्था केली जाते. या वर्षीही निवासी मंडपासह भोजन मंडप, स्वागत कक्ष, वैद्यकीय सेवा, अग्निशमन नियंत्रण कक्ष, नियोजन कक्ष यासोबत पिण्याच्या पाण्यासाठी २७० ठिकाणी नळांची व्यवस्था, दररोज १५ टँकरमधून दीड लाख लिटर पाणी, २३ फिरती शौचालये, समुद्रकिनाऱ्यानजीक ७५ शौचालये व ९४ स्नानगृहे तसेच शिवाजी पार्क परिसरात ११० स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पालिकेचे २०० अधिकारी व सहा हजार कर्मचारी काम करणार आहेत. अनुयायांसाठी देण्यात येणाऱ्या या प्राथमिक सुविधांमध्ये या वर्षी मोबाइल चार्जिग पॉइंटची भर पडली आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जनसंपर्क सल्लागारांनी दिली. गर्दीवर नजर ठेवण्यासाठी तसेच हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी या वेळी एकाऐवजी दोन फुग्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.