रुग्णांच्या समुपदेशन, तपासणीची सोय; गुप्तरोग आणि एचआयव्हीच्या चाचण्यांची साधने

मुंबई : एचआयव्ही किंवा गुप्तरोगांच्या तपासणीसाठी पुढे न येणाऱ्या मुंबईतील वस्त्यांमधील संशयित रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण (एमडॅक्स) संस्थेने नुकतेच फिरते आरोग्य चिकित्सालय (हेल्थ क्लिनिक मोबाइल व्हॅन) सुरू केली आहे. मंगळवारपासून ही व्हॅन शहरातील वस्त्यांमध्ये फिरणार आहे. त्यामुळे थेट वस्तीपातळीवर तपासणी मोहीम सुरू होईल.

शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये एचआयव्ही संशयित रुग्ण असतात. परंतु ते स्वत:हून कोणत्याही चाचण्या करण्यासाठी आरोग्य केंद्रावर येत नाहीत. त्यामुळे तपासणी शिबिरांमधूनच त्यांच्यापर्यंत पोहोचून चाचणी, समुपदेशन आणि औषधोपचार करणे शक्य आहे. हे विचारात घेऊन ‘एमडॅक्स’ने हे फिरते आरोग्य चिकित्सालय सुरू केले आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (नॅको) संस्थेने एमडॅक्सला २००८ साली फिरते आरोग्य चिकित्सालय चालविण्यासाठी काही बस दिल्या होत्या. आता त्यातील बऱ्याचशा बसची कार्यक्षमता कमी झाली आहे. या बस आकाराने मोठय़ा असल्याने शहरातील छोटय़ा वस्त्यांमध्ये नेणे शक्य नाही.

वस्त्यांमध्ये, तपासणी शिबिरांमध्ये छोटय़ा आकाराच्या व्हॅन नेणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे या नवीन व्हॅनचा शिबिरांना फायदा होणार आहे.

एमडॅक्सच्या वतीने महिन्याला २० ते २५ तपासणी शिबिरे होतात. प्रत्येक शिबिरात सुमारे ५० व्यक्तींची तपासणी करण्यात येते, अशी माहिती एमडॅक्सच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.

व्हॅन अशी

‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’ने सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत ही व्हॅन एमडॅक्सला दिली आहे. सुमारे २० लाख रुपयांच्या या व्हॅनमध्ये तीन खोल्या आहेत. एका खोलीमध्ये डॉक्टरांना तपासणी करण्याची सुविधा आहे. दुसऱ्या खोलीमध्ये रुग्णांना समुपदेशनासाठीची सोय आहे आणि तिसऱ्या खोलीमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गुप्तरोग आणि एचआयव्हीच्या चाचण्या करण्यासाठीची साधने आहेत.