News Flash

भारतीय बाजारपेठेवर मोबाइल कंपन्यांची चढाई!

येत्या काही वर्षांत ‘तरुणांचा देश’ अशी भारताची ओळख निर्माण होणार असून, जगातील सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतात असणार आहे. सध्या भारताचे

| November 4, 2013 12:48 pm

येत्या काही वर्षांत ‘तरुणांचा देश’ अशी भारताची ओळख निर्माण होणार असून, जगातील सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतात असणार आहे. सध्या भारताचे सरासरी वय हे २५ असून हीच नवी पिढी मोबाइल्स, टॅब आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची मोठी बाजारपेठ असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील ‘दादा’ कंपन्यांनी विशेषत: मोबाइल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेला आपले ‘लक्ष्य’ केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने मोबाइल आणि टॅबची प्रचंड प्रमाणात विक्री झाली असून, दूरचित्रवाणी संच, शीत कपाट अर्थात फ्रिज, वातानुकूलन यंत्रे, डीव्हीडी प्लेअर या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही चांगली मागणी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.
मोबाइल्स, टॅब आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या मोठय़ा साखळी दुकानांमधूनही दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकृष्ट करून घेण्यासाठी वेगवेगळ्या योजना सादर करत असतात. त्या योजनांनाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ‘नोकिया’ कंपनीने त्यांच्या ‘लुमिया’ मोबाइल्ससाठी जाहीर केलेल्या (कोणत्याही अन्य स्मार्टफोन्सच्या बदल्यात) लुमिया फोन घ्या, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेत चालू स्थितीतील स्मार्टफोन्सचे तीन ते चार हजार रुपये ग्राहकांना देण्यात आले. ज्यांना सॅमसंग, नोकिया, एलजी, एचटीसी अशा मोठय़ा कंपन्यांचे स्मार्ट मोबाइल्स घेणे परवडत नाही, अशा ग्राहकांकडून स्मार्टफोन्समधील बहुतांश सोयी असलेल्या पण या कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमत असलेल्या मायक्रोमॅक्स, कार्बन आदी मोबाइल्सला अधिक पसंती असल्याचे एका साखळी दुकानाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. मोबाइल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर केलेल्या चढाईसंदर्भात आणि ग्राहकांच्या एकूणच बदललेल्या मानसिकतेबाबत ‘क्रोमा इन्फिनिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित जोशी यांनी ‘लोकसत्ता’ सांगितले की, मोबाइल कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ म्हणजे मोठी संधी आहे. महागडे मोबाइल्सही भारतीय खरेदी करू शकतात, असा विश्वास या कंपन्यांना वाटू लागला आहे. भारतीय सण, उत्सव यांचा विचार करून या कंपन्या आपली नवनवी उत्पादने बाजारात आणत आहेत. अ‍ॅपल कंपनीने आपला ‘गोल्ड मोबाइल’ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दाखल केला आहे. सॅमसंग नोट-३, एचटीसी, नोकिया आदी कंपन्यांचेही स्मार्टफोन मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
यंदाच्या दिवाळीत शीत कपाटे, कपडे धुण्याची स्वयंचलित यंत्रे यांनाही चांगली मागणी होतीच, पण टॅबलेट्सची विक्रीही अधिक प्रमाणात झाली.
मुलांसाठीही महागडी खरेदी
सध्या पालक सजग झाले असून भविष्यातील विचार करून पालकांनी आपल्या मुलांसाठी महागडय़ा टॅबलेट्सचीही खरेदी केली. एखादे गॅजेट महाग असले तरी त्यालाही पालकांनी पसंती दिली. नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असतील तर एकाच्या पगारातून त्या वस्तूच्या किमतीचा हप्ता भरला जाताना दिसते, असे निरीक्षण ‘क्रोमा इन्फिनिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित जोशी यांनी नोंदविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 12:48 pm

Web Title: mobile companies take over indian market in diwali
Next Stories
1 अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
2 देशभरातील ४७ हजार गँगमन ‘साहेबा’च्या घरी चाकरीला
3 डेंग्यूचे मुंबईत सर्वाधिक रुग्ण
Just Now!
X