मानवी जीवनात दळणवळणाचे साधन म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणारा मोबाइल फोन आता मानवी आरोग्यास घातक ठरू लागला असून त्याविषयी सविस्तर अभ्यास करून ठाण्यातील साकेत बागुल या सहावीतील विद्यार्थ्यांने मोबाइलमुळे होणारे घातक प्रदूषण दाखवून देणारा ‘जीवघेणा जिवलग’ या नावाचा प्रयोग तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या प्रयोगास यंदाच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. या भरारीनंतर त्याचा आत्मविश्वास अधिकच उंचावला असून भविष्यात जीवशास्त्रामध्ये संशोधन करण्याचा त्याचा मानस आहे. तसेच या प्रयोगानंतर त्याने स्वत: मोबाइलचा वापर करणे सोडून दिले आहे.
साकेत ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकतो. त्याचे बाबा उमेश बागुल हे आय.टी. व्यावसायिक. तर आई- मानसी एका खासगी कंपनीत आहेत. मोठा भाऊ विनीत संगणक अभियंत्याचे शिक्षण घेत आहे. अभ्यासाप्रमाणेच साकेत खेळातही प्रवीण असून टेनिसमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. या खेळामध्ये त्याने अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. लहानपणापासूनच त्याला विज्ञानाविषयी कुतूहल असल्याने घरामध्ये तो छोटे-मोठे प्रयोग करत असतो, असे त्याची आई मानसी यांनी सांगितले.
विज्ञानाविषयी असलेल्या आवडीतूनच साकेतने मोबाइल फोनमुळे होणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रदूषणावर आधारित ‘जीवघेणा जिवलग’ या नावाचा प्रयोग अहवाल तयार करून त्यातून मोबाइलच्या विद्युतलहरींमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली आहे. मानवी जीवनात दळणवळणाचे साधन म्हणून मोबाइल फोन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र मोबाइल जितका उपयुक्त तितकाच मानवी आरोग्यास घातक आहे, असे या प्रयोगातून त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्याने प्रयोग अहवालाच्या मुखपृष्ठावर ‘जग जवळ येतंय, पण आरोग्याचं काय?’ असा संदेश दिला आहे. मोबाइलचा वापर किती आणि कसा करावा, याविषयीही त्याने इत्थंभूत माहिती दिली आहे.  
मोबाइलमुळे होणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रदूषणाचे दुष्परिणाम कशा प्रकारे होऊ शकतात, हे सिद्ध करण्यासाठी त्याने टोमॅटोवर प्रात्यक्षिक केले आहे. त्यामध्ये त्याने एका टोमॅटोच्या दोन्ही बाजूंना दोन मोबाइल फोन ठेवले. काही तासांनंतर टोमॅटो फुटून त्यातून रस येऊ लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने हा प्रयोग यंदाच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सादर केला आणि या प्रयोगासाठी त्याला सुवर्णपदक मिळाले, अशी माहिती त्याचे वडील उमेश यांनी दिली. ‘लोकसत्ता’मध्ये ‘कुतूहल’ या सदरामध्ये अनंत ताम्हणे यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचून त्याला हा प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

जीवशास्त्रात संशोधन करण्याचा मानस
जीवशास्त्राविषयी मला आवड असून त्यामध्येच भविष्यात संशोधन करण्याचा मानस आहे. ज्या सूक्ष्म जीवांचा शोध लागलेला नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याची इच्छा असून त्यामध्ये हे सूक्ष्म जीव मानवी जीवनात कितपत उपयुक्त आणि हानीकारक आहेत, याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे, असे साकेत याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.