अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. या चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसादला अटक

धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद यांना एनसीबीने शनिवारी अटक केली. सुशांतच्या मृत्यूबाबत त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. क्षिजीत यांच्यासोबत एनसीबीने धर्मा प्रॉडक्शनचे माजी सहायक दिग्दर्शक अनुभव चोप्रा यांच्याकडेही चौकशी केल्याचं समजतंय.

एनसीबीने शनिवारी अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान यांच्याकडे चौकशी केली. सुशांतसोबत काम करणाऱ्या या दोन अभिनेत्रींकडे चार ते पाच तास चौकशी केली. सुशांत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान साराचे नाव घेतले होते. तर या प्रकरणाच्या चौकशीतून श्रद्धा सुशांतच्या पुणे इथल्या फार्महाउसमध्ये आयोजित पार्टीत हजर होती, अशी माहिती एनसीबीच्या हाती लागली.

दुसरीकडे एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर अभिनेत्री दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्याकडे चौकशी केली. दोघींना समोरासमोर आणून अंमलीपदार्थांचे सेवन, पुरवठा आदीबाबत प्रश्न विचारण्यात आले.