मानसी जोशी

भाडेतत्त्वावर मोबाइल देण्याची योजना जोरात; महागडय़ा फोनचा अनुभव घेण्याची सर्वसामान्यांना संधी

नामांकित कंपनीचे महागडे मोबाइल वापरण्याची इच्छा असूनही आर्थिक बजेट लक्षात घेऊन आपल्या इच्छेला मुरड घालणाऱ्यांना अशा मोबाइलकडे आकर्षित करण्यासाठी आता संकेतस्थळांनी नवी टूम काढली आहे. अ‍ॅपल, सॅमसंग, वन प्लस अशा कंपन्यांचे महागडे स्मार्टफोन चक्क भाडेतत्त्वावर देण्याच्या योजना सध्या तेजीत असून अधिकाधिक ग्राहक त्याचा लाभ घेत आहेत. यामुळे खिशाला कमी कात्री लावून मोबाइल वापरता येतोच, पण त्याचबरोबर कालांतराने नवनवीन मोबाइल वापरण्याची संधीही ग्राहकांना मिळत आहे.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सध्या  महिन्याभरात बाजारात नवीन तंत्रज्ञान येत असताना दर वर्षांला मोबाइल बदलण्याचे प्रमाणही वाढले आहे. नवीन मोबाइलची किंमत जास्त असल्याने ते भाडय़ानेही घेतले जात आहेत. परदेशात भाडय़ाने मोबाइल ही संकल्पना जुनी असली तरीही भारतात मात्र ही संकल्पना तशी नवीन आहे. संकेतस्थळांवर ‘अ‍ॅपल आयफोन एक्स’, ‘आयफोन ८’, ‘सॅमसंग गॅलॅक्सी एस९’, ‘सॅमसंग गॅलॅक्सी नोट८’ आणि ‘वन प्लस ७टी’ हे नवीन मोबाइल भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. त्यासाठी ग्राहकांना ठरावीक रक्कम अनामत म्हणून द्यावी लागते. या संकेतस्थळांवर पहिल्या सात दिवसांत मोबाइल मोफत वापरण्यास दिला जातो. मोबाइल आवडला नसल्यास ग्राहकांना परत करण्याची सोयही उपलब्ध आहे. मोबाइलचा काही भाग खराब झाल्यास ठेवीतून विम्याची रक्कम वगळली जाते.

मोबाइलच्या मूळ किमतीच्या तुलनेत दर कमी असल्याने ग्राहकांचा कल या सुविधेकडे जास्त दिसून येतो. बाजारात नवीन आलेल्या ‘अ‍ॅपल आयफोन ११ प्रो’ या मोबाइलचा दर १,१३,९००  हजार रुपये आहे. ‘अ‍ॅपल आयफोन ११ प्रो’ हा मोबाइल भाडय़ाने घ्यायचा असल्यास दर महिन्याला ४,८४९ हजार रुपये भाडे आकारले जाते आणि दर महिन्याला ११,७४८ हजार रुपये ठेव म्हणून भरावे लागतात.

भाडे आणि ठेव मिळून एका वर्षांकाठी ६९,९३६  हजार रुपये खर्च येतो. ‘दर महिन्याला अंदाजे १०० ग्राहक मोबाइल भाडय़ाने घेण्यासाठी विचारणा करतात. त्यापैकी २० ग्राहक हे मोबाइल भाडय़ाने घेत आहेत. सध्या ग्राहकांमध्ये ‘आयफोन ११’, ‘एक्सआर’, ‘६एस’, ‘वनप्लस ७टी प्रो’, ‘७ टी’ आणि ‘सॅमसंग गॅलॅक्सी नोट १’, ‘नोट एस १०’, ‘ए१७’ हे मोबाइल लोकप्रिय आहेत. मोबाइलच्या मूळ किमतीपेक्षा भाडे कमी असल्याने या सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘रेंटोमोजो’ या वस्तू ऑनलाइन भाडय़ाने देणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक वस्तूही भाडय़ाने

मोबाइलसोबत आता लॅपटॉप, फर्निचर, सोफा, मायक्रोवेव्ह, फ्रिज, एसी, कूलर आणि एलईडी टीव्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तूही संकेतस्थळांवर भाडय़ाने उपलब्ध आहेत. वस्तूंच्या ब्रँड आणि दर्जानुसार त्यांचे दर कमीअधिक आहेत. याशिवाय व्यायामासाठी लागणारे साहित्यही अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे. या गृहोपयोगी वस्तूंचे दर ६०० रुपयांपासून ते २००० हजार रुपये प्रति महिना असल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडण्यासारखे दर आहेत.