मोबाईल सिमकार्ड ब्लॉक करून एकारात्रीत विविध बँकातील रक्कम वळवून तब्बल पावणे दोन कोटीचा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीस मुंबई सायबर  सेलने गजाआड केले आहे. एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली होती. चुनचुन कमलाकांत पाठक असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

यापूर्वी याच गुन्ह्यात समावेश असलेल्या आरोपी सागर तारालाल दास याला पोलीस पथकाने कोलकत्ता येथून अटक केल्याने या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे. आरोपी पाठक याला स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. ते माटुंगा परिसरात राहतात. त्यांचा बेडशीट निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदाराचे माहीम येथे कार्यालय आहे तर भिवंडी येथे कारखाना आहे. कंपनीच्या एका खाजगी बँक खात्यावर नेट बँकिंगची सुविधा घेण्यात आली होती. या व्यवहारासाठी तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक बँकेला देण्यात आला होता. २७ डिसेंबरला कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर तक्रारदार हे घरी निघून गेले.

मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवर एक मिसकॉल आला होता. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद झाला. त्यांनी दुसऱ्या दिवशी नवे सीम कार्ड घेतले. दरम्यान  २७ ते २८ डिसेंबर या एका रात्रीत व्यवसायिकाच्या करट अकाऊंटमधून पावणे दोन कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले.
नेटबँकिंगद्वारे दुसऱ्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती. व्यावसायिकाने लेखी अर्ज् करुन सायबर सेलकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या खात्यातून ट्रान्स्फर झालेली रक्कम ज्या बँक खात्यात गेली ती खाती सर्व कोलकत्ता येथील असल्याचे सायबर सेलला समजले. त्यानंतर बँकेचे सर्व व्यवहार हे थांबविण्यात आले.

मुंबई सायबर सेलने याच गुन्ह्यात प्रथम कोलकत्ता येथून आरोपी सागर दास याला अटक केली त्यानंतर दुसरा आरोपी चुनचुन पाठक याला अटक केली. पाठक यांच्या खात्यात चौदा लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. ती रक्कम सागर याने एटीएम द्वारे काढून घेतली होती. सायबर सेलने तापस सुरु ठेवला असून अनेकांची नावे या अपहार प्रकरणी समोर येत असल्याची माहिती सायबर सेल अधिकाऱ्याने दिली.