पुण्याजवळ प्रकल्पाचा विचार; १३ हजार रोजगार निर्मिती

मुंबई : मोबाइलसंबंधित स्पीकर, हेडफोनसाठी तरुणांची सर्वाधिक पसंती असणाऱ्या ‘जेबिल’ या अमेरिकी कंपनीने महाराष्ट्रात सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीमध्ये जेबिल कंपनी आघाडीवर आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोन, मोबाइलचे सुटे भाग, गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाची वेष्टने आदी क्षेत्रांत कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे.

जेबिलच्या या गुंतवणुकीविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा केली. ‘ या प्रकल्पामुळे गुंतवणूकवाढीस हातभार लागेल. शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. कंपनीला रेडीशेड, जमीन व इतर सुविधा प्राधान्याने दिल्या जातील,’ असे देसाई यांनी स्पष्ट केले.

‘जेबिलला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी जमीन देण्याची महाराष्ट्राची तयारी आहे. प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी तातडीने १.५० लाख चौरस फू ट सुसज्ज जागा देण्याची, त्यांना हवे असलेले प्रतिदिन ३० लाख लिटर पाणी, उच्चदाब वीजपुरवठा अशा सर्व सुविधा देण्याची एमआयडीसीची तयारी आहे. जमिनीबाबतही राज्याच्या औद्योगिक धोरणानुसार विविध पर्याय त्यांना देण्यात आले असून आवडीचा पर्याय ते निवडू शकतात. सुरुवातीला २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असली, तरी पुढील तीन-चार वर्षांत ३ हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होईल,’ असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये ‘जेबिल’ आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून मोबाइलचे सुटे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन तेथे होईल. त्यातून १३ हजार जणांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.