मेमरी कार्ड नसल्याने वापराविना पडून असल्याचे शिक्षण समितीच्या बैठकीत उघड

मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे करण्यासाठी पालिकेकडून देण्यात आलेले ४० हजार टॅब नादुरुस्त म्हणून तर काही मेमरी कार्ड नसल्याने वापराविना पडून आहेत. दहावीची परीक्षा तोंडावर आली तरी या टॅबचा वापर मुलांना करता येत नाही. गुरुवारी शिक्षण समितीच्या बैठकीत ही बाब समोर आली. पुढील बैठकीत याबाबत निश्चित माहिती देण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षांनी दिले आहेत.

युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून टॅब योजना पालिका शाळेत राबविण्यात आली. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. यात त्या त्या इयत्तेचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला होता. मात्र या योजनेचा आता पुरता बोजवारा उडाला आहे. सुमारे ४० हजार टॅब आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र यातील बहुतांश टॅब बंद आहेत. काहींमध्ये मेमरी कार्ड नसल्याने त्याचा वापर होत नाही. तर इतर नादुरुस्त झाल्याने विनावापर पडून आहेत.

आता शैक्षणिक  वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना टॅबच्या दुरुस्तीसाठी नवे कंत्राट दिले जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी गुरुवारी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडून या गोंधळावर बोट ठेवले. पालिका शाळांत देण्यात आलेल्या टॅबची संख्या किती, त्यापैकी किती सध्या वापरात आहेत, किती बंद आहेत आदी माहिती प्रशासनाने

द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक  साईनाथ दुर्गे यांनी केली. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी टॅब दिले गेले. मात्र अभ्यासासाठी मुलांना त्याचा वापर होतच नसेल तर ते गंभीर आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.

टॅब दुरुस्तीसाठी नवीन कंत्राट

बंद टॅब दुरुस्तीकरिता कंत्राट दिले जाणार आहे. त्यासाठी कोटय़वधींचा खर्च येईल. परीक्षा तोंडावर आल्याने यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना त्याचा किती उपयोग होईल याबाबत शंका आहे. त्यामुळे हा खर्च करण्यापेक्षा नवीन टॅब खरेदी करावेत, अशी सूचना दुर्गे यांनी केली.