23 January 2020

News Flash

रेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट

कुर्ला, सीएसएमटी, ठाणे स्थानकांत सर्वाधिक विलंब

|| सुशांत मोरे

प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम; कुर्ला, सीएसएमटी, ठाणे स्थानकांत सर्वाधिक विलंब

तिकीट खिडक्यांवरील रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने मोबाइल तिकीट, एटीव्हीएम, जेटीबीएस (जनसाधारण तिकीट आरक्षण सेवा)सारख्या सुविधा आणल्या. मात्र त्याचा वापर अद्यापही पुरेपूर होत नसल्याने सीएसएमटी, कुर्ला, ठाणेसह अन्य गर्दीच्या स्थानकांत तिकीट खिडक्यांद्वारे तिकीट काढण्यात प्रत्येक प्रवाशाला पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर झटपट तिकीट उपलब्ध व्हावे आणि त्यासाठी अन्य तिकीट सुविधांचा लाभ घ्यावा, यासाठी मध्य रेल्वेने ‘मिशन पाच मिनिटे’ ही योजना आखली आहे.

प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर तिकीट उपलब्ध होण्यासाठी लागणारा वेळ याचा आढावा मध्य रेल्वेने नुकताच घेतला. त्या वेळी काही स्थानकांत पाच मिनिटांच्या आत तर काही स्थानकांत पाच मिनिटांपेक्षा जास्त कालावधी तिकीट देण्यासाठी लागत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांत दोन रुपये जादा देऊन तिकीट उपलब्ध करणारी जेटीबीएस सेवा, त्याबरोबरीने स्मार्ट कार्ड असलेली एटीव्हीएम आणि आता मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा आणली. पहिल्या दोन सुविधांमुळे तिकीट खिडक्यांवर पाच मिनिटांत तिकीट उपलब्ध करण्याची योजनाही यापूर्वी आखली. त्यानुसार जेटीबीएस चालक, एटीव्हीएम मशीन वाढवण्यात आल्या. परंतु त्या कमीच पडतात की काय असे नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात दिसून आले.

मध्य रेल्वेने घेतलेल्या आढाव्यात नेरुळ, रबाळे, बेलापूर, पनवेल, खांदेश्वर, वाशी या स्थानकांत गर्दीच्या वेळी तिकीट खिडक्यांवर तीन ते चार मिनिटांत तिकीट उपलब्ध होते. गर्दी नसेल तर अवघ्या दोन मिनिटांत तिकीट मिळत आहे. हार्बरवरील रे रोड, जीटीबी नगर, किंग्ज सर्कल, कॉटनग्रीन स्थानकांतही चार मिनिटांत तिकीट उपलब्ध होते. परंतु सीएसएमटी, कुर्ला, टिळकनगर, ठाणे, कल्याण स्थानकांत गर्दीच्या वेळी तिकीट खिडक्यांवर तिकीट मिळवण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे पाहणीत दिसून आले.

या स्थानकांसह आणखी काही गर्दीच्या स्थानकात पाच मिनिटांत तिकीट उपलब्ध करण्यासाठी ‘मिशन पाच मिनिट’ अशी योजना मध्य रेल्वेने आखली आहे. ज्या स्थानकात तिकीट खिडक्यांवर तिकीट देण्यासाठी जादा वेळ लागत आहे, तेथे अधिक खिडक्या सुरू करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे, मोबाइल अ‍ॅपबाबत जनजागृती करणे, एटीव्हीएम व जेटीबीएसची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले. परिणामी गर्दीच्या स्थानकात पाच मिनिटांच्या आत तिकीट उपलब्ध होणे शक्य होणार आहे.

मोबाइल तिकीट अ‍ॅपचा वापर

  • कुर्ला स्थानक- ६.९९ टक्के प्रवासी
  • टिळकनगर स्थानक-४.५ टक्के प्रवासी
  • सीएसएमटी- १८.१२

टक्के

  • ठाणे- १९.८९ टक्के
  • कल्याण- १९.४८ टक्के

तिकीट सुविधांचा वापर

  • एटीव्हीएम- २६ टक्के
  • जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा- १३ टक्के
  • यूटीएस अ‍ॅप- सरासरी ५ टक्के
  • तिकीट खिडक्यांवर- ५६ टक्के

First Published on July 23, 2019 3:09 am

Web Title: mobile ticket atvm jtbs mumbai railway mpg 94
Next Stories
1 अंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी
2 दुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट
3 यंत्रणेतले ‘शेखचिल्ली’
Just Now!
X