तिकिटांसाठी रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोर लागणाऱ्या लांब रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने सुरू केलेल्या अ‍ॅपद्वारे तिकीटसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून सकाळच्या सुमारास अ‍ॅपवरून तिकीट काढताना नेटवर्कचे अडथळे येत असल्याने प्रवाशांना खोळंबून राहावे लागत आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेवर दररोज एक लाखाहून अधिक मोबाइल तिकिटे काढली जात आहेत. प्रतिसाद जरी वाढत असला तरी तिकीट काढताना प्रवाशांना नेटवर्क मिळत नसल्याने गेले महिनाभर अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यात रेल्वेच्या ‘क्रिस’लाही (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम) यश आलेले नाही.

अ‍ॅपवर सुरुवातीला मोबाइलवर तिकिटाची मागणी नोंदवावी लागते. नंतर स्थानकात असलेल्या एटीव्हीएम यंत्रावर त्याची छापील प्रत मिळवावी लागते. मात्र यात बराच वेळ जात असल्याने कागदविरहित तिकिटाचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला. मात्र या दोन्ही सेवांकरिता रेल्वेची जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. रेल्वे हद्दीत ३० मीटर अंतरापर्यंत जीपीएस यंत्रणा कार्यरत असते. त्यातही अनेक अडथळे येत असल्याने तिकीट काढणे वेळखाऊ प्रक्रिया होती. परंतु रेल्वेने जीपीएसची व्याप्ती वाढवल्याने अ‍ॅपवरील तिकीट सहज मिळवता येऊ लागले. मात्र गेल्या एक महिन्यांपासून मोबाइल अ‍ॅपवर तिकीट काढताना काही तांत्रिक अडचण येत आहे. यासंदर्भात क्रिसचे (मुंबई)महाव्यवस्थापक कार्तिकेय सिंह यांनी सांगितले की, सकाळी ९ ते १० च्या सुमारास मोठय़ा संख्येने तिकिटे काढली जातात. त्यामुळे नेटवर्कची समस्या येत असावी. हे नेमके इंटरनेट जोडणीमुळे की अन्य तांत्रिक दोष आहे, याची माहिती घेत आहोत.

मोबाइल तिकिटांत वाढ

* मध्य रेल्वेवर सध्या दररोज सरासरी २९ हजार ३५२ तिकिटांवर १ लाख ६६ हजार ९०४ प्रवास करत आहेत. जून २०१९ मध्ये हीच संख्या वाढून ५३ हजार तिकीट विक्री व ३ लाख ७८ हजार प्रवाशांवर गेली.

* पश्चिम रेल्वेवरही दररोज ५५ हजार प्रवासी मोबाइल अ‍ॅप तिकिटांच्या माध्यमातून प्रवास करत होते. २०१९-२० मध्ये हीच संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली.

* मोबाइल तिकिटातून मध्य रेल्वेला जून २०१९ मध्ये प्रत्येक दिवशी ३३ लाख १४ हजार रुपये उत्पन्न मिळाले असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.