ग्राहकांकडून खरेदीसाठी मोबाइल वॉलेट, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डचा वापर वाढला

मोबाइल वॉलेट, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड या पर्यायांना स्वीकारून छोटय़ा वस्तू, खाद्यपदार्थ किंवा हौस-मौजेची खरेदी करण्याचा व्यवहार एका क्षणात होतो. हा व्यवहार   भारतात लक्षणीयरीत्या वाढत असून कार्ड, पीपीआय आणि मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत तब्बल ५,४७०.२९ अब्ज रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खिसा पाहून खरेदीचा पारंपरिक प्रकार संपुष्टात येत असून नोटांनी खच्च भरलेल्या पाकिटाची ग्राहकाला गरज उरली नाही.

मोबाइल रीचार्ज करायचे असेल वा अगदी आपल्या जवळच्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी करायची असेल वा रिक्षा किंवा टॅक्सी भाडे द्यायचे असेल या सर्वासाठी सध्या मोबाइल वॉलेटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे खरेदीसाठी  या माध्यमाचा वापर दिवसागणीक वाढत आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या माहितीनुसार पेटीएम, फ्रीचार्ज आणि मोबिविक यासारख्या मोबाइल वॉलेटच्या व्यवहार २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत ७४.८ कोटीपर्यंत पोहचला आहे.  ही वाढ गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अकरा पटींनी अधिक नोंदविण्यात आली आहे. ई-पेमेंट प्रणालीमध्ये प्रामुख्याने डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि ‘प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट’ (पीपीआय) या तीन प्रकारांचा समावेश होतो. यातील पीपीआयमध्ये मोबाइल वॉलेट आणि आधीच पैसे खर्चून घेण्यात आलेल्या विविध कुपन्सचा समावेश असतो. या विभागात सर्वाधिक व्यवहारांची नोंद करण्यात आली आहे आणि त्यात मोबाइल वॉलेटचा मोठा वाटा आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या माहितीनुसार त्यांच्याकडे ४७ पीपीआय नोंदणीकृत असून यात मोबाइल वॉलेट्स कंपन्यांसह कार्ड आणि कुपन्स कंपन्यांचाही समावेश आहे. याचबरोबर एकूण देशातील मोबाइल बँकिंगच्या व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून ४.०४ खर्व रुपयांचे व्यवहार झाल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.  मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून १३३.३५ अब्ज रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. तर मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून ३,१८०.२० अब्ज रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली आहे.

खिशात पैसे घेऊन जाणे किंवा सुटय़ा पैशांसाठी वाद घालणे यापेक्षा मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून पैसे खर्च करणे लोकांना अधिक सोयीस्कर वाटू लागले आहे. येत्या काळात हा वापर वाढणार आहे. आज देशात होणाऱ्या ३० टक्के गुंतवणुकीपैकी केवळ १२ ते १४ टक्के गुंतवणूक बँकांकडे वळते आहे. या व्यवहारांमुळे बँकांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढणार आहे. आपली अर्थ व्यवस्था ‘कॅशलेस’ होणे शक्य नसले तरी या सुविधांच्या वाढत्या वापरामुळे ‘लेस कॅश’ अशी नक्कीच होऊ शकते.

अजित रानडे, अर्थतज्ज्ञ

 

मोबाइल वॉलेटची सुविधा पैसे देणारा आणि स्वीकारणारा दोघांना सोयीची असल्यामुळे आज मोठय़ा ब्रँडपासून ते रिक्षावाला, टॅक्सीवाला अगदी पाणीपुरी वालाही मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून पैसे स्वीकारु लागला आहे. सणांच्या काळात भेट देण्यासाठीही मोबाइल वॉलेटचा वापर होत आहे. सणांच्या दिवशी भेट देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तीच्या मोबाइल वॉलेटमध्ये पैसे जमा केल्याचे समोर आले आहे. असेच व्यवहार दिवाळीलाही अपेक्षित आहेत.

सोनिया धवन, उप महाव्यवस्थापक, पेटीएम

 

untitled-1