मुंबईवरील हल्ल्याच्या कटाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला लष्कर-तैय्यबाचा दहशतवादी अबू जुंदाल याला ५ फेब्रुवारी रोजी हजर करण्याचे आदेश विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने मंगळवारी दिले.
जुंदाल हा २००६ सालच्या औरंगाबाद शस्त्र आणि स्फोटके साठय़ाप्रकरणातही आरोपी असून ५ फेब्रुवारी रोजी त्याच्यासह आणखी २१ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार असल्याने न्यायालयाने त्याला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
जुंदाल याने आपल्या वकिलामार्फत पत्र लिहून आपल्याला याप्रकरणी व्यक्तिश: हजर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. आतापर्यंत त्याला ‘व्हिडीओ कॉन्फरन्िंसग’द्वारे हजर करण्यात येत होते. त्याने प्रकरणाच्या सुनावणीचे चित्रिकरण करण्याचीही मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्याने राज्याच्या दहशतवादी पथकाकडून आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या वकिलाशीही बोलू दिले जात नसल्याने आपल्याविरुद्ध नेमके काय आरोप ठेवण्यात आले आहेत याची कल्पना नसल्याचा आरोप त्याने केला आहे.