मेट्रो रेल्वेच्या विमानतळ रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी मेट्रोच्या तिसऱ्या डब्यात आग लागल्याची घोषणा झाली आणि प्रवाशांची एकच धावपळ उडाली. मात्र अवघ्या सहा मिनिटांत गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले..
मुंबई मेट्रो रेल्वेच्या डब्याला लागलेली ही आग खरी नव्हती तर भविष्यात मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानंतर खरोखरच अशी एखादी गंभीर घटना घडली तर काय करायचे, मेट्रो रेल्वे व्यवस्थापन, अग्निशम दल, पोलीस या संभाव्य दुर्घटनेला सामोरे जाण्यास तयार आहेत का? याची घेतलेली ही चाचणी होती. ‘मेट्रो’च्या सुरक्षा चाचण्यांबरोबरच आता ‘मेट्रो रेल्वे’वर ‘मॉक ड्रील’ची सुरुवात झाली असल्यामुळे मेट्रो रेल्वे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापन आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी मेट्रो रेल्वेच्या विमानतळ रेल्वे स्थानकावर ‘मॉक ड्रील’ घेण्यात आले. रेल्वे स्थानकावर आग लागली असता प्रवाशांची सुटका करण्याबाबतच्या या ‘मॉक ड्रील’मध्ये अवघ्या सहा मिनिटांत सर्व प्रवाशांना सुखरूप रेल्वे स्थानकाबाहेर काढण्यात आले.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विमानतळ रेल्वे स्थानकाच्या जवळ ही गाडी असताना रेल्वेच्या तिसऱ्या डब्यात आग लागली असल्याची घोषणा केली गेली. तातडीने ही गाडी थांबविण्यात येऊन सर्व यंत्रणांना आणीबाणीच्या परिस्थितीचे संदेश पाठविले गेले. अग्निशमन दलालाही आग लागली असल्याचा संदेश पाठविण्यात आला. अग्निशमन दल सर्व साधनांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अवघ्या सहा मिनिटांत गाडीतील प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात येऊन ‘मॉक ड्रील’चे हे नाटय़ संपले.