मुंबई विमानतळावर एका मॉडेलने केलेली थट्टामस्करी सुरक्षा यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरली. ही थट्टा मस्करी त्या मॉडेललाही महागात पडली असून याप्रकरणी तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अफवा पसरवल्याप्रकरणी मॉडेलविरोधात गुन्हा दाखल झाला असून यात दोषी ठरल्यास त्या मॉडेलला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मुंबई विमानतळावर टी २ टर्मिनलवर कांचन ठाकूर ही २७ वर्षाची तरुणी तिच्या तीन मित्रांसोबत दिल्लीला जाण्यासाठी आली होती. हे चौघे एअर इंडियाच्या विमानातून दिल्लीला जाणार होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बॉर्डींग गेटवर कांचनची तपासणी पूर्ण झाली. तिच्या मैत्रिणीची तपासणी सुरु असताना कांचनने सुरक्षा रक्षकाला तिची बॅगेची नीट तपासणी करायला सांगितले. तिच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे कांचनने सुरक्षा रक्षकाला सांगितले. कांचनने मस्करीमध्ये हे विधान केले असले तरी सुरक्षा रक्षकाने याची गांभीर्याने दखल घेतली. त्याने तातडीने सीआयएसफच्या जवानांना बोलावले आणि सीआयएसएफने चौघांनाही ताब्यात घेतले. या सर्व गोंधळात विमानाचे उड्डाण खोळंबले होते. शेवटी या चौघांचे सामान उतरवून विमान दिल्लीला रवाना झाले. कांचनमुळे विमानाने तब्बल एक तास उशीराने उड्डाण केले.

थट्टामस्करी अंगलट आल्याचे दिसल्यावर कांचन ठाकूरचा पारा चढला. तिने माफी मागण्याऐवजी सीआयएसएफच्या जवानांशी हुज्जत घातली. दहशतवादी विमानात येतात तेव्हा तुम्ही काही करत नाही. पण आम्ही मस्करी केली तरी आमच्यावर कारवाई होते असे तिचे म्हणणे होते. शेवटी सीआयएसएफच्या अधिका-यांनी कांचन आणि तिच्या मित्रांना पोलिसांकडे सोपवले. पोलिसांनी या सर्वांना मुंबईबाहेर जाण्यावर निर्बंध घातले. कांचनचा हा प्रताप तिच्या एका मित्रालाही महागात पडला आहे. त्याची आई आजारी असून तिला भेटण्यासाठी तो दिल्लीला निघाला होता. पण कांचनमुळे आता त्यालाही मुंबईतच थांबावे लागणार आहे. पोलिसांनी कांचनविरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात दोषी ठरल्यास तिला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

एअर इंडियाच्या अधिका-यांनी या कारवाईचे समर्थन केले. थट्टामस्करीमुळे विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण होते. बॉम्ब असल्याची मस्करी केली असली तरी या प्रकाराने उपस्थितांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते याकडेही अधिका-यांनी लक्ष वेधले.