राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; वाहनांच्या वेगावर अंकुश

मुंबई महानगरात बिकट वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी  ‘इंटेलिजण्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) ही आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली राबविण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

८९१ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाद्वारे शहरातील सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून वेगवान तसेच चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहन चोरीलाही आळा घालण्यास मदत होणार आहे.

मुंबई महानगरात सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील सुमारे ९५ टक्के रस्त्यांची देखभाल ही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मुख्यत्वे उड्डाणपूल बांधण्यात येतात. शहरात सध्या सुमारे ३४ लाख वाहने असून प्रतिहजार व्यक्तींमागे साधारणत: २६१ व्यक्तींकडे स्वत:चे वाहन आहे.

शहरातील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा यातून प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेतून कार्यक्षमतेवर होणारा परिणाम या सर्वावर उपाय सर्व रस्ते, उड्डाणपूल यांच्यावरील एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी ही आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात येणार आहे.

प्रस्तावित यंत्रणेत काय असणार?

* रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करून तसेच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करणे शक्य होणार आहे.

* गरजेप्रमाणे सिग्नल यंत्रणेची वेळ प्राथम्यक्रमानुसार बदलता येणार आहे. स्मार्ट सिग्नलिंग,परवाने, नंबर प्लेट ओळख, अतिवेगवान अथवा चुकीच्या दिशेने येणारी वाहने आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, चोरीची वाहने शोधण्यास मदत होणार आहे.