२०१४च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षासाठी मत न देता देशासाठी मत द्या, असे आवाहन करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईतील भरगच्च सभेतून भारताला ‘व्होट फॉर इंडिया’ची साद घातली. इंग्रजांना हुसकावण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसपासूनच आता ‘भारतमुक्त’ करायची वेळ आली असल्याचे सांगत मोदींनी काँग्रेसवर यथेच्छ तोंडसुख घेतले. केंद्रातील भ्रष्टाचारापासून महाराष्ट्रातील आदर्श, सिंचन अशा घोटाळय़ांवर बोलताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले, मात्र काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चकार शब्दही काढला नाही. मोदींच्या या ‘राष्ट्रवादी’ मौनामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असतानाच भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा नामोल्लेखही ‘नमों’नी टाळला. या पाश्र्वभूमीवर भाजप नवीन समीकरणांची चाचपणी तर करत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.
‘आदर्श’ पासून ते सिंचन अशा राज्यातील विविध घोटाळ्यांचा उल्लेख करीत त्याबद्दल काँग्रेसला दोष देताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख मात्र  खुबीने टाळला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील दरी वाढावी हा त्यामागचा उद्देश तर असेलच पण भविष्यातील राजकारणाचा विचार करता राष्ट्रवादीला दुखावण्याचे टाळण्यात आले असण्याची शक्यता आहे.  
सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करीत मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. दरवर्षी महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळाचा सामना का सहन करावा लागतो, असा सवालही त्यांनी केला. भाजप सत्तेत असता तर ही दुर्दशा झाली नसती, असे मत मांडले. वास्तविक सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर आरोप झाले असताना मोदी यांनी राष्ट्रवादीचा काहीही उल्लेख केला नाही. सिंचन घोटाळ्यात कारवाई व्हावी म्हणून भाजपचे नेते न्यायालयात गेले आहेत. तरीही मोदी यांनी या मुद्दय़ावर राष्ट्रवादीला स्पर्श करण्याचे टाळले. ‘आदर्श’ अहवाल फेटाळण्यावरून काँग्रेसवर टीका करतानाच राहुल गांधी यांच्या भाषणाचा त्यांनी हवाला दिला. एकीकडे भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे काही नेते देतात, पण त्याच वेळी महाराष्ट्रातील काँग्रेस सरकार मात्र भ्रष्ट नेत्यांना वाचविण्यासाठी पुढाकार घेते, असा आरोप मोदी यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनीही ‘आदर्श’ व अन्य घोटाळ्यांवरून काँग्रेसवर टीका केली. पण मोदी यांच्याबरोबरच राजनाथसिंग यांनीही महाराष्ट्र सरकारमध्ये भागीदार असलेल्या राष्ट्रवादीचे नाव घेण्याचे टाळले.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संबंधात कटुता आली आहे. अशा वेळी उभयतांमधील दरी अधिक वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा अन्य नेते मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी करीत असले तरी मोदी यांनी मात्र महाराष्ट्रात आल्यावरही पवार किंवा राष्ट्रवादीचे नाव घेण्याच टाळले. राष्ट्रवादीसाठी सर्व पर्याय खुले आहेत याची आठवण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नेहमी केली जाते याकडे भाजपच्या एका नेत्याने लक्ष वेधले.