यूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाईने पिचलेल्या जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है..’ असे स्वप्न दाखविणाऱ्या एनडीए सरकारने एका महिन्यातच महागाईचा बोजा सर्वसामान्य जनतेवर लादला आहे. पैशांची चणचण भासत असल्याचे सांगत रेल्वेने १४.२ टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, मालवाहतूक दरातही ६.५ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. या भाडेवाढीचा फटका मुंबईकरांनाही बसणार असून, मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना आता पासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.
ही भाडेवाढ २५ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार उपनगरीय रेल्वे तिकिटांमध्ये कसे बदल होतील, हे अद्याप निश्चित झाले नसले, तरी येत्या दोन दिवसांत नवे तिकीट दर जाहीर केले जातील, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आलोक बडकुल यांनी सांगितले.
मासिक पासधारकांसाठी सध्या त्यांनी निवडलेल्या दोन स्थानकांदरम्यानच्या १५ फेऱ्यांचा विचार करूनच दर आकारले जातात. मात्र आता २५ जूनपासून यात थेट दुपटीने वाढ होणार आहे. यापुढे मासिक पास देताना ३० फेऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे, तर प्रथम दर्जाच्या प्रवाशांसाठी साधारण दर्जाच्या चौपट भाडे आकारले जाणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीच्या तिकीट दरांतही वाढ होणार आहे.
मासिक पासाचे दर (रुपयांमध्ये)
जुना दर        नवा दर
८५        १५०
१९०        ४८०
७९५ (प्रथम वर्ग)        १९३० (प्रथम वर्ग)
१७४० (प्रथम वर्ग)        २१२० (प्रथम वर्ग)

भारतीय रेल्वेला आर्थिक चणचण भासत आहे. अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन संयुक्त पुरागामी आघाडी सरकारने रेल्वेसाठी २९ हजार कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र तरीही रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. त्यामुळे भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.
– सदानंद गौडा, रेल्वेमंत्री

रिक्षा-टॅक्सी दरवाढ?
मुंबईकरांसाठी आणखी एक धक्का म्हणजे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी यांच्या भाडेवाढीच्या प्रस्तावालाही राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार किमान भाडय़ात दोन रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टप्प्यास रिक्षासाठी १.४० पैसे आणि टॅक्सीसाठी १.६० पैसे भाडेवाढ अपेक्षित आहे. मात्र रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने मान्यता दिल्यानंतरच ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. हे आदेश येण्याआधीच नव्या दराप्रमाणे भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाईल, असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी स्पष्ट केले.