केंद्रातील हिंदुत्त्ववादी सरकारने पाकिस्तानमध्ये बळजबरीने सुरू असलेल्या शीखांच्या धर्मांतराचा प्रकार रोखावा, अशी आग्रही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात त्यांनी यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडली आहे. पाकिस्तानातील शीख आज संकटात आहेत. ज्यावेळी हिंदू धर्म संकटात होता तेव्हा याच शिखांनी इस्लामी शासकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजून हिंदू धर्मीयांचे रक्षण केले होते. केंद्रातील हिंदुत्ववादी सरकारने या इतिहासाचे स्मरण करून आता पाकिस्तानातील शिखांची धर्मांतरे रोखायलाच हवीत, असे त्यांनी या अग्रलेखात म्हटले आहे.

अनेक प्रसारमध्यमांनी पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लिम धर्मीयांचे राजरोसपणे धर्मांतर सुरू असल्याचे सप्रमाण दाखवून दिले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या भागात सुमारे सवाशे वर्षांपासून शीख धर्मीय मोठ्या संख्येने राहतात. मात्र अलीकडच्या काळात तेथील कट्टरपंथीयांना शिखांचे वास्तव्य खटकू लागले आहे. त्यामुळेच त्यांना मारूनमुटकून मुसलमान करण्याचे जुनेच इस्लामी तंत्र तेथील धर्मांधांनी सुरू केले आहे. मात्र, पाकिस्तानचे सरकार नेहमीप्रमाणे ही गोष्ट नाकारत आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने शीखांच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याप्रकरणी पाकिस्तानशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे पाऊल स्वागतार्ह असले तरी पाकिस्तानातील ‘लातों के भूत’ चर्चेच्या ‘बातां’नी धर्मांतराच्या कारवाया थांबवतील काय, असा प्रश्न अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात सुमारे २५ ते ३० टक्के हिंदू व शीख राहत होते. मात्र, त्यानंतर धर्मांतराच्या मोहिमेमुळे आज तेथील हिंदू व शिखांची संख्या जेमतेम दोन-अडीच टक्क्यांवर आली आहे. एवढे हिंदू व एवढे शीख गेले कुठे?, असा प्रश्न आजवर कोणत्याही सत्तेत असलेल्या पक्षाने विचारला नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे फावले आणि तेथील हिंदू धर्मीय तसेच शिखांना ते नामशेष करत सुटले आहेत. आपल्याकडील भंपक निधर्मी अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात म्हणून गळे काढतात. मात्र, पाकिस्तानातील शीख धर्मीयांच्या इस्लामीकरणावर मात्र यापैकी कोणीही बोलणार नाही, असा टोलाही उद्धव यांनी अग्रलेखातून लगावला आहे.