चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही, हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. या वक्तव्याचा पुरेपूर फायदा घेत ‘घुसखोरी केली नाही’ असे चीन जगभर सांगत सुटला आहे. त्यामुळे मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करल्याची टीका प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आली.

चीन प्रश्न हाताळण्यातील अपयश आणि २० शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले. मुंबईत सकाळी मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, चरणजितसिंग सप्रा, मधु चव्हाण, सचिन सावंत आदींनी शहिदांना अभिवादन केले.

‘सरकारने खुलासा करावा’

गांधी भवन येथे दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनच्या घुसखोरीवरून मोदी सरकारचा खरपूर समाचार घेतला. देशहिताचा विचार करत केंद्र सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु ‘चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही’, हे पंतप्रधानांचे वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पुरेसे नसून सरकारने यावर विधानावर खुलासा करावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.