सहारा आणि बिर्ला समुहाकडून लाच घेतल्याच्या आरोपावरुन मुंबई काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात टॅटू आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातावर ‘हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है’ असे गोंदवून घेत मोदींचा निषेध केला आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी मुंबईत काँग्रेसतर्फे संजय निरुपम यांच्या उपस्थितीत टॅटू आंदोलन करण्यात आले. यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातावर ‘हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है’ असे गोंदवून घेतले.  नरेंद्र मोदी यांनी २०१३ मध्ये सहारा समुहाकडून सहा महिन्यात ९ वेळा पैसे घेतले. बिर्ला समुहाकडूनही त्यांनी पैसे घेतल्याचे उघड झाले होते. हा आमचा आरोप नाही, तर आयकर विभागाला धाडी दरम्यान आढळलेल्या डायरीतून ही माहिती उघड झाली आहे असे निरुपम यांनी सांगितले. आता मोदींनी फक्त हे सांगावे की त्यांनी पैसे घेतली की नाही अशी मागणी त्यांनी केली. देशाचे पंतप्रधान रिश्वतखोर असल्याची भावना देशवासीयांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निरुपम हे चांगले पत्रकार आहेत, पण उत्साहाच्या भरात ते हातावर माजी पंतप्रधान लिहायला विसरले असावे असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसची मानसिक दुर्गुणता दिसून आली असून हा पक्ष किती खालच्या पातळीवर गेला आहे हे यातून दिसते असे त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. कोणी किती घोटाळे केले हे टूजी आणि कोळसा घोटाळ्यातून दिसून येते. देशाच्या जनतेनेही हे बघितले आहे असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे जामिनावर बाहेर आहेत हे विसरु नये. पराभवाच्या भीतीमुळे काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या या आंदोलानवर नाराजीही व्यक्त होत आहे. ऐवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणे योग्य आहे का असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा समुहाकडून ४० कोटी तर बिर्ला समुहाकडून १२ कोटी स्वीकारल्याचा आरोप केला आहे. भाजपने वारंवार हे आरोप फेटाळून लावले असून राहुल गांधी यांचे आरोप निराधार आहे, मोदी हे गंगेसमान पवित्र असल्याचे भाजपने म्हटले आहे.