महाराष्ट्रात महायुती असली, तरी प्रत्येक मतदारसंघ आपला आहे याची जाणीव ठेवून सर्वच मतदारसंघांत जोमाने प्रचारात उतरा, प्रत्येक मतदाराशी संपर्क साधा, मतदारसंघातील तळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे भक्कम करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील किमान एक लाख मतदारांशी संपर्कात राहा असे सल्ले देत भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक रणनीतीचा ‘पंचसूत्री कानमंत्र’ राज्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला.
‘मिशन २०१४’ या नावाने येत्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची रूपरेखा नरेंद्र मोदी यांनी आखली असून त्याची पंचसूत्रीच त्यांनी गुरुवारी दुपारी राज्यातील कार्यकर्त्यांसमोर मांडली. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २६ जागांवर शिवसेना तर २२ जागांवर भाजपने निवडणुका लढविल्या आहेत. असे जागावाटप असले तरी शिवसेनेचा उमेदवार असलेला मतदारसंघदेखील आपलाच आहे, आणि तो जिंकलाच पाहिजे, तरच संसदेतील २७२ जागांचा जादूई आकडा गाठणे शक्य होईल, असे मोदी यांनी सांगितल्याचे प्रदेश भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. राज्यातील तरुण मतदार हा पक्षाचा मोठा आधारस्तंभ राहणार असल्याने, सोशल मीडिया आणि आधुनिक संपर्कप्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून त्या माध्यमातून तरुण मतदारांशी संपर्क ठेवा असेही मोदी यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात अशा किमान एक लाख मतदारांशी संपर्क राखला, तर विजय अवघड नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस राज्याचे केंद्रीय प्रभारी राजीवप्रताप रुडी, पक्षाचे केंद्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ नेते व पक्षाचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवर तसेच पक्षाचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना- रिपाइं- भाजप युतीमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेस सामावून घेण्याबाबत राज्यातील भाजप नेते आग्रही आहेत. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी आजच्या या बैठकीत मतप्रदर्शन करतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदी यांनी मनसेचा उल्लेखही केला नाही. उलट, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उत्तराखंड आपत्तीनंतर मोदी यांनी तेथे केलेल्या मदतकार्यवरून उठलेल्या गदारोळानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी पंधरा मिनिटे वेळ काढून उद्धव ठाकरे यांची मुद्दाम भेट घेतली. भाजप-सेना यांच्यातील परस्पर सहकार्य दृढ करण्यावर यावेळी उभय नेत्यांनी भर दिल्याचे सांगण्यात आले.
मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्वाच्या बैठकीत पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी मात्र उपस्थितच नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुढील आठवडय़ापासून गडकरी काही दिवसांसाठी नॉर्वेच्या दौऱ्यावर जात असल्याने दिल्लीत व्हिसासंबंधी कामात ते व्यग्र असल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांच्या वतीने देण्यात आले. संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात विनय सहस्रबुद्धे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मात्र गडकरी व्यासपीठावर दिसल्याने हे तर्कवितर्क शमले.