जंतुसंसर्ग टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील नऊ शस्त्रक्रिया विभागांचे ‘मॉडय़ुलर’ शस्त्रक्रिया विभागात रूपांतर करण्यात येत आहे. या अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागात प्रत्यारोपण, शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या दुर्धर रोगांवरील शस्त्रक्रिया करताना जंतुसंसर्ग टाळणे शक्य होऊ शकेल.

पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमधील नऊ शस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिक अशा ‘मॉडय़ुलर’ शस्त्रक्रिया विभागात रूपांतरित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता.

त्यासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात २१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयातील पाच, तर नायर आणि लोकमान्य टिळक रुग्णालयातील प्रत्येकी दोन शस्त्रक्रिया विभागांचे मॉडय़ुलर शस्त्रक्रिया विभागात रूपांतर करण्यात येत आहे.

मॉडय़ुलर शस्त्रक्रिया विभागाच्या भिंती आणि छत एका विशिष्ट गुणवत्तेच्या स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात येत आहे. त्याला विशिष्ट प्रकारचा जंतुप्रतिबंधक रंग देण्यात येतो. हा रंग जिवाणू आणि बुरशी प्रतिबंधक असतो. त्यामुळे शस्त्रक्रिया विभागात रुग्णाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता तुलनेत कमी असते.

या शस्त्रक्रिया विभागात अत्याधुनिक दिवे, दरवाजे, शस्त्रक्रिया नियंत्रण कक्ष, क्ष-किरण यंत्रणा, आदी सुविधांचा समावेश आहे.

शस्त्रक्रिया विभागातील हवा शुद्ध करण्याची अत्याधुनिक यंत्रणाही तेथे उपलब्ध असणार आहे. परिणामी, हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यास मदत होईल, असे पालिका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

केईएम रुग्णालयातील मूत्ररोग चिकित्साशास्त्र (युरॉलॉजी) विभाग, बालरोग शल्यचिकित्सा (पेडियाट्रिक सर्जरी) विभाग, सुघटन शल्यचिकित्सा (प्लास्टिक सर्जरी) विभाग या तीन विभागांमधील शस्त्रक्रिया विभागांचे रूपांतर मॉडय़ुलर शस्त्रक्रिया विभागात करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर नायर आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील मूत्ररोग चिकित्साशास्त्र विभागातील दोन, तर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील मूत्ररोग चिकित्साशास्त्र विभागातील दोन शस्त्रक्रिया विभागांचे रूपांतर मॉडय़ुलर शस्त्रक्रिया विभागात करण्यात येणार आहे.